भाजपची १४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; यातही खडसे, तावडे, बानवकुळेंचे नाव नाही

भाजपची १४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; यातही खडसे, तावडे, बानवकुळेंचे नाव नाही

एकनाथ खडसे

भारतीय जनता पार्टीतर्फे बुधवारी रात्री उशीरा १४ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या दुसर्‍या यादीदेखील माजी मंत्री एकनाथ खडसे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे नाव जाहीर न झाल्याने अद्याप हे दोन्ही नेते प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांचेही नाव यादी नाही. दरम्यान, १४ जणांच्या या यादीत पुन्हा एकदा आयरामांना संधी दिली असून नुकताच भाजप प्रवेश केलेल्या गोपीचंद पडाळर यांना बारामती येथून तर नमिता मुदंडा यांना कैज येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपर्फे पहिली यादी जाहीर केल्यानंतर अनेक विद्यमान आमदारांचा पट्टा कट करण्यात आला होता. तर अनेक विद्यमान मंत्री प्रकाश मेहता, विनोद तावडे यांचे देखील नाव जाहीर करण्यात आलेले नव्हते. तर दुसरीकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपले नाव जाहीर झालेले नसतानाच उमेदवारी अर्ज सादर करत सर्वांना धक्का दिला होता. त्यामुळे भाजपासह विरोधकांचे लक्ष देखील दुसर्‍या यादीवर लागून राहिले होते. अखेर बुधवारी रात्री जे. पी. नड्डा यांनी दुसरी यादी जाहीर केली.

भाजपतर्फे जाहीर करण्यात आलेल्या या यादीत साकरी विधानसभा मतदारसंघातून मोहन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. धामणगाव येथून प्रताप अडासाड, रमेश मावस्कर यांना मेळघाट येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गोंदिया येथून गोपाळदास अग्रवाल, अहेरी येथून अमरिश राजे अत्राम, पुसाड येथून निलय नाईक, उमेरखेड येथून दिलीप बोरसे, उल्हासनगर येथून कुमार उत्तमचंद आईलानी, बारामती येथून गोपीचंद पडाळकर, मावळ येथील संजय भेगडे, कैज येथून नमिता मुंदडा, लातूर शहर शैलेश लाहोटी आणि उद्गीर डॉ. अनिल कांबळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

First Published on: October 2, 2019 10:38 PM
Exit mobile version