कलम ३७० हटवण्याला विरोध करणं काँग्रेस-राष्ट्रवादीचा निर्लज्जपणा – अमित शहा

कलम ३७० हटवण्याला विरोध करणं काँग्रेस-राष्ट्रवादीचा निर्लज्जपणा – अमित शहा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह

एकीकडे कलम ३७० हटवल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली. यावेळी त्यांनी कलम ३७० हटवण्याचं जोरकसपणे समर्थन केलं. त्याच वेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला विरोध करणं हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्लज्जपणा आहे’, अशा शब्दांत अमित शहांनी विरोधकांवर निशाणा साधला.

‘जनतेनं त्यांना जागा दाखवावी’

यावेळी कलम ३७० हटवण्याचा निर्णय कसा योग्य होता, याचं अमित शहांनी जोरकसपणे समर्थन केलं. त्यावेळी या निर्णयाला विरोध करणारे राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. ‘येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्षांसोबत यायचं की कुटुंबकेंद्रीत पक्षांसोबत जायचं हे महाराष्ट्राच्याच जनतेनं ठरवायचं आहे. ३७० कलम हटवण्याला विरोध करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं जागा दाखवून द्यावी’, असं अमित शहा यावेळी म्हणाले.

‘देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री’

दरम्यान, यावेळी बोलताना अमित शहा यांनी राज्याचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असतील, असे संकेत दिले. यावेळी फडणवीसांचा उल्लेख करताना ‘राज्याचे विद्यमान आणि निवडणुकांनंतरही होणारे मुख्यमंत्री’ असं अमित शहा म्हणाले. त्यामुळे ‘आमचं ठरलंय’ असं कंठरवाने म्हणणाऱ्या शिवसेनेला यातून सूचक इशारा मिळाला असल्याचं बोललं जात आहे.

First Published on: September 22, 2019 1:39 PM
Exit mobile version