अखेर सत्तेसाठी मुख्यंमत्रीच घेणार पुढाकार? मातोश्रीवरही जाण्याची शक्यता!

अखेर सत्तेसाठी मुख्यंमत्रीच घेणार पुढाकार? मातोश्रीवरही जाण्याची शक्यता!

देवेंद्र फडणवीस

शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तास्थापनेवरून आणि विशेषत: मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादामध्ये राज्यात सत्तास्थापनेला उशिर होत आहे. तसेच, जनता संभ्रमात असून नक्की आपण बहुमत दिलेल्या शिवसेना-भाजपचं सरकार येणार की शिवसेनेने सत्ता हवी म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंब घेऊन बनवलेल्या तिसऱ्याच आघाडीचा मुख्यमंत्री होणार? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्रात सत्ता टिकलीच पाहिजे’, असा दबाव मुख्यमंत्र्यांवर दिल्लीहून येत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे, अखेर मुख्यमंत्र्यांनीच सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेकडून अद्यापही सत्तास्थापनेच्या भाजपच्या फॉर्म्युल्यावर प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये स्वत: मुख्यमंत्री यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे, तर गरज पडली, तर मुख्यमंत्री स्वत: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी जाण्याचीही शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे सरकार कुणाचं? या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर मिळण्याची शक्यात निर्माण झाली आहे.

शपथविधी सोहळ्याआधी वाद मिटावेत!

दरम्यान, येत्या ५ किंवा ६ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदी शपथविधी करण्याचं नियोजन भाजपकडून करण्यात येत असल्याचं समजतंय. यासाठी वानखेडे स्टेडियमचं बुकिंग देखील करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. या पार्श्वभूमीवर शपथविधीआधी दोन्ही सत्ताधारी पक्षांमधले वाद मिटावेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे.


हेही वाचा – वाघ गुरगुरतो म्हणून आपण त्याला सोडून देत नाही-सुधीर मुनगंटीवार!

संजय राऊतांच्या टीकेचा परिणाम?

गेल्या काही दिवसांपासून सामनामधून उद्धव ठाकरेंच्या नावाने अग्रलेखातून आणि नंतर प्रत्यक्ष पत्रकार परिषदेमध्ये देखील संजय राऊत सातत्याने भाजपवर तोफ डागत आहेत. सन्मानाने युती व्हावी अशी मागणी करत आहेत. त्यासोबतच शिवसेनेची ताठर भूमिका देखील वारंवार मांडत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमधलं वातावरण अधिक तणावाचं झालं असून या पार्श्वभूमीवर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसचा पाठिंबा घेऊन भाजपलाच सत्तेपासून दूर ठेवणार असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

First Published on: November 2, 2019 12:57 PM
Exit mobile version