‘ही’ असतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर आव्हानं!

‘ही’ असतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर आव्हानं!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि २ दशकांनंतर शिवसेना पुन्हा सत्तेत आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर आलेलं शिवसेनेचं सरकार तीन पायांची शर्यत असल्याची टिप्पणी किंवा उपहास सध्या होऊ लागला आहे. त्याला या तिनही पक्षांच्या नेत्यांनी सडेतोड उत्तर दिलं असलं, तरी या दाव्यांमध्ये अजिबातच तथ्य नाही असं काही म्हणता येणार नाही. तीन पक्षांचं मिळून आघाडी सरकार चालवण्याची आव्हानं तर नक्कीच असतील. एकीकडे आघाडी सरकार चालवायचं, दुसरीकडे १०५ अधिक १४ म्हणजेच ११९ आमदारांच्या विरोधी पक्षाचा सामना करायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधिमंडळ कामकाजाचा आणि सरकारच्या दैनंदिन व्यवहारांचा अनुभव नसताना ते सारंकाही आत्मसात करायचं अशी तीन आघाड्यांवरची आव्हानं उद्धव ठाकरेंना पेलावी लागणार आहेत.

सरकारच्या कामगिरीवर अनेकांचं लक्ष

उद्धव ठाकरेंसमोर सर्वात पहिलं आव्हान असेल ते म्हणजे तीन भिन्न विचारसरणीच्या पक्षांना सोबत घेऊन सरकार ५ वर्ष चालवणं. इतका खटाटोप करून स्थापन झालेल्या सरकारवर समर्थकांसोबतच विरोधक देखील भिंग घेऊन लक्ष ठेवणार आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये सत्तावाटप किंव समन्वयाच्या दृष्टीने मतभेद होऊ नयेत आणि झाले तरी ते टोकाला जाऊ नयेत, याची काळजी उद्धव ठाकरेंना घ्यावी लागणार आहे. त्यासोबतच पहिल्यांदाच विधानसभेत जाणाऱ्या उद्धव ठाकरेंना लवकरात लवकर सरकारी कामकाजाशी जुळवून घ्यावं लागेल.


हेही वाचा – संजय राऊत म्हणतात, ‘आता गोव्यात भूकंप’; शिवसेनेचं मिशन गोवा!

सव्वाचार लाख कोटींची कर्ज!

आत्तापर्यंत पक्षप्रमुख म्हणून कामकाज पाहायचा अनुभव उद्धव ठाकरेंना आहे. मात्र, पहिल्यांदाच सरकारचे प्रमुख म्हणून ते काम पाहाणार आहेत. त्यामुळे विश्वासू अधिकाऱ्यांच्या नेमणुकीपासून ते सरकारी आणि प्रशासकीय प्रश्न समजून घेण्यापर्यंतची कामं मुख्यमंत्र्यांना तातडीने करावी लागतील. त्यासोबतच तिन्ही पक्षांमधून आलेल्या मंत्र्यांमध्ये योग्य समन्वय ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना त्यांचं संपूर्ण वेळापत्रक देखील बदलावं लागणार आहे. राज्यावर सध्या सव्वाचार लाख कोटींचं कर्ज आहे. त्या पार्श्वभूमीवर आर्थिक परिस्थिती नियंत्रणात ठेवतानाच कर्जमाफीसारख्या योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी आकडेमोड करताना तारेवरची कसरत ठाकरे सरकारला करावी लागणार आहे.

पक्षवाढीसाठी धोरण आवश्यक

दरम्यान, हे सर्व करत असतानाच तिन्ही पक्षांसोबत सत्तेत बसून राज्यात शिवसेना आहे तिथे शाबूत ठेऊन तिच्या वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे मुख्यंमत्रीपदाची खुर्ची जरी उद्धव ठाकरेंच्या ताब्यात असली, तरी मुख्यमंत्रीपदावर बसून त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, हे नक्की!

First Published on: November 29, 2019 12:11 PM
Exit mobile version