अंबरनाथमध्ये मनसे उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल

मनसे

मागील वर्षी एका कार्यक्रमात रामदास आठवले यांना धक्काबुक्की करणाऱ्या प्रवीण गोसावी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी त्यालासुद्धा बेदम मारहाण झाली होती. याप्रकरणी त्याने आयोजकांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली होती. मात्र तक्रार नोंदविण्यात न आल्याने या प्रकरणी त्याने न्यायालयात दाद मागितली. आता न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार त्या कार्यक्रमाचे आयोजक आणि विद्यमान मनसे उमेदवार सुमेध भवार यांच्याविरुद्ध १० महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण गोसावीची आठवले यांना धक्काबुक्की

अंबरनाथ विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तरुण चेहरा म्हणून सुमेध भवार यांना पुढे करण्यात आले होते. अंबरनाथमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात सुमेध भवार नेहमी पुढाकार करतात. त्यानुसार मागील वर्षी एका कार्यक्रमात रामदास आठवले यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. ८ डिसेंबर २०१८ रोजी नेताजी मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर आठवले हे आपल्या कार्यकर्त्यांसह खाली उतरत असताना प्रविण गोसावी नावाच्या अंबरनाथ मधील एका तरुणाने पुष्पगुच्छ देण्याच्या निमित्ताने रामदास आठवले यांना धक्काबुक्की केली होती.

१० महिन्यानंतर गुन्हा दाखल

हा प्रकार घडल्यानंतर कार्यकर्त्यांनी गोसावी यांना जबर मारहाण केली. त्यानंतर रामदास आठवले यांना मारहाण केल्याप्रकरणी गोसावी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र घडलेल्या प्रकारानंतर गोसावी याला झालेल्या जबर मारहाणी प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. या प्रकरणी गोसावी याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. अखेर १० महिन्यानंतर गोसावी याच्या फिर्यादीवरून अजय जाधव आणि सुमेध भवार यांच्याविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुमेध भवार यांना विचारले असता ते म्हणाले की, “मी या कार्यक्रमात केवळ उपस्थित होतो. मारहाणीशी माझा कुठलाही संबंध नाही.”

First Published on: October 9, 2019 6:06 PM
Exit mobile version