काँग्रेसचे धीरज देशमुख आजारी; रुग्णालयात दाखल

काँग्रेसचे धीरज देशमुख आजारी; रुग्णालयात दाखल

धीरज देशमुख

राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वातावरण आहे. प्रत्येक पक्षाचे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त आहेत. काही नेते प्रचारात इतके व्यस्त आहेत की, त्यांना स्वत:च्या प्रकृतीकडे देखील लक्ष देता येत नाही. मात्र, प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. असाच काहीसा प्रकार माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख यांच्यासोबत घडला आहे. धीरज देशमुख आजारी पडले आहेत. त्यामुळे त्यांना लातूर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धीरज यांनी स्वत: आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर या संदर्भात माहिती दिली आहे.

नेमके काय म्हणाले धीरज देशमुख?

‘कोणत्याही लहान मोठ्या आजाराकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नसते. मागील दोन-तीन दिवसांपासून अंगात थोडासा ताप होता, पण प्रचार सभांच्या व्यस्ततेमुळे तब्येतीकडे जरा दुर्लक्षच झाले. शेवटी नाईलाजाने काल लातूरमध्येच दवाखाण्यात अॅडमीट व्हावे लागले आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे सध्या तापीच्या आजाराचे प्रमाण सगळीकडे वाढले आहे.सध्या मी उपचार घेत असून आता प्रकृती सुधारते आहे. काळजी करावी असे कांहीं नाही. माझे जिवाभावाचे कार्यकर्ते, हितचिंतक व आपण सर्वजण माझ्यासाठी प्रचार करत आहात.या दरम्यान आपण देखील तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या शुभेच्छा आणि स्नेहाच्या बळावर मी लवकरच बरा होवून आपणासोबत प्रचारात सहभागी होईन हा विश्वास मला आहे. माझ्या अनुपस्थितीत आपण प्रचाराचे कार्य जोमात सुरू ठेवल्याबद्दल मी आपले शतश: आभार व्यक्त करू इच्छितो’, असे धीरज देशमुख फेसबुक पोस्टमधून म्हणाले.

धीरज देशमुख पहिल्यांदा विधानसभेच्या रिंगणात

धीरज देशमुख पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. याअगोदर त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांचे थोरले बंधू अमित देशमुख लातूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. लातूरच्या राजकारणात देशमुख कुटुंबियांचे एक वेगळे वर्चस्व राहिलेले आहे. आता या निवडणुकीच्या रिंगणात अमित यांच्या पाठोपाठ धीरज देखील उतरले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.


हेही वाचा – अखेर नारायण राणे यांचा मुलांसह अधिकृतपणे भाजपात प्रवेश

First Published on: October 15, 2019 3:54 PM
Exit mobile version