एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी पुन्हा निवड

एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी पुन्हा निवड

एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी तर सुनील प्रभू यांची विधानसभेच्या प्रतोदपदी निवड

शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी कुणाची निवड होणार? याविषयी गेल्या २ दिवसांपासून राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू होती. आदित्य ठाकरेंची देखील गटनेतेपदी निवड होऊ शकते, अशी शक्यता देखील वर्तवली जात होती. मात्र, अखेर विद्यमान गटनेते एकनाथ शिंदे यांचीच एकमताने विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या सर्व विजयी आमदारांची शिवसेना भवनावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीमध्येच एकनाथ शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. दरम्यान, शिवसेना प्रतोद म्हणून सुनिल प्रभू यांची देखील पुन्हा निवड करण्यात आली आहे.


हेही वाचा – भाजपकडे बहुमत असेल, तर खुशाल सत्ता स्थापन करावी-संजय राऊत

बैठकीनंतर आमदार राज्यपालांच्या भेटीला

दरम्यान, शिवसेनेची मुंबईतली बैठक संपल्यानंतर सर्व विजयी आमदार राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. या भेटीमध्ये राज्यातल्या विविध प्रश्नाविषयी चर्चा करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, त्यासोबतच सर्व आमदारांच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर शिवसेना करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


हेही वाचा – शिवसेनेला दोन मंत्रीपदे ज्यादा द्या; पण लवकर काय ते ठरवा-रामदास आठवले

एकीकडे शिवसेना-भाजप यांच्यातल्या सत्तावाटपावर अद्याप तोडगा निघालेला नसताना दोन्ही पक्षांकडून गटनेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यासोबतच भाजपने देवेंद्र फडणवीसच ५ वर्षांसाठी पुढचे मुख्यमंत्री होतील, हे देखील जाहीर करून टाकलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी बुधवारी सकाळीच पुन्हा एकदा सत्ता आणि मुख्यमंत्रीपद यांच्या समसमान वाटपाच्या मुद्द्यावर शिवसेना ठाम असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे आता नक्की या सत्तास्थापनेमध्ये शिवसेनेला सन्मानजनक वाटा मिळणार का? अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागली आहे.

 

First Published on: October 31, 2019 1:44 PM
Exit mobile version