दक्षिण कोल्हापुरात पुन्हा महाडिक-पाटील संघर्ष

दक्षिण कोल्हापुरात पुन्हा महाडिक-पाटील संघर्ष

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील राजकारण काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यात चालते. २०१९ च्या लोकसभेत इथे हे पाटील-महाडिक संघर्ष झाला आणि विधानसभेतही याच दोन्ही घराण्यांमध्ये राजकीय संघर्ष पहायला मिळणार आहे.

‘आमचं ठरलंय’ ही सतेज पाटील गटाची २०१९च्या लोकसभेसाठीची घोषणा होती. धनंजय महाडिक यांना पाडणे, हे या घोषणेमागील उद्देश होता. त्याप्रमाणे शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक निवडून आले. 2009 आणि 2014च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना सतेज (बंटी) पाटील यांनी सर्व ताकदिनीशी सहकार्य केले होते. तोपर्यंत धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्या मैत्रीचे दाखले कोल्हापूरकर देत होते.

सतेज पाटील हे काँग्रेसचे नेतृत्व करणारे तर धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे दोघांचेही गट सक्षम असल्यामुळे दोन्ही गटांमध्ये वेगवेगळ्या कारणाने नेहमीच धुसफूस होत होती. सतेज पाटील यांच्या पाठिंब्यामुळे 2014च्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही धनंजय महाडिक निवडून आले.धनंजय महाडिक गटाने मात्र ही गोष्ट मान्य केली नाही. त्यामुळे पुन्हा दोन्ही गटात वाद सुरू झाला. निवडणुकीतील सभांमध्ये एकमेकांवर केलेली चिखलफेक यामुळे दोन्ही गटांची मने दुखावली.

२०१९च्या विधानसभेसाठी धनंजय महाडिक यांचे भाऊ अमल हे भाजपचेच आमदार आहेत. त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, जोडीला आता धनंजय महाडिकही भाजपात आले आहेत. दुसरीकडे, काँग्रेसतर्फे ऋतुराज पाटील यांना उमेदवारी दिली जाणार आहे. चेहरा ऋतुराज यांचा असला तरी सतेज पाटील हेच निवडणूक लढणार आहेत. इथे शिवसेना खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी ऋतुराज पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. म्हणजेच महाडिकांविरूद्ध त्यांच्यावर नाराज असलेले राष्ट्रवादीवाले, सतेज पाटील यांचे म्हणजेच काँग्रेस आणि जोडीला शिवसेनेचे मंडलिक असे तिहेरी आव्हान आहे. गेल्या लोकसभेत जसा काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच अंतर्गत सामना झाला तसाच आता एकप्रकारे आता भाजप-सेनेत होणार आहे.

कसा आहे कोल्हापूर दक्षिण (274) मतदारसंघ
या मतदार संघात मराठा, ओबीसी, धनगर असा मिश्र मतदार आहे. मराठा समाजचे वर्चस्व आहे. जवळपास निम्मा शहरी आणि निम्मा ग्रामीण अशी याची भौगोलिक विभागणी आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अमल महाडिक यांना 1,05,489 मते तर सतेज पाटील यांना 96,961 मते मिळाली होती.

First Published on: September 26, 2019 5:12 AM
Exit mobile version