ज्यांना सत्ता हवी आहे त्यांनी माझ्याकडे यावं – रामदास आठवले

ज्यांना सत्ता हवी आहे त्यांनी माझ्याकडे यावं – रामदास आठवले

“ज्यांना सत्ता हवी आहे त्यांनी माझ्याकडे यावं. सत्ता मिळवण्यासाठी केवळ ‘महायुती’ हाच पर्याय आहे,” असे सूचक विधान राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये ‘भीमसृष्टी’च्या उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महापौर राहुल जाधव, खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

सत्तेसाठी ‘महायुती’ हाच पर्याय – रामदास आठवले

यावेळी राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, “आगामी विधान सभेसाठी आर.पी.आय पक्षाला १० जागा मिळण्यासाठी आग्रही आहोत. या संदर्भात मुख्यमंत्राशी बोलणं झालं असून यावर विचार करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले”, असल्याचे रामदास आठवले म्हणाले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी रामदास आठवले यांना वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये झालेल्या बिघाडीविषयी प्रश्न केला. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना रामदास आठवले म्हणाले की, “ज्यांना सत्ता हवी आहे त्यांनी माझ्याकडे यावं, सत्ता मिळवायची असल्यास ‘महायुती’ हाच पर्याय आहे,” असे सूचक विधान आठवले यांनी केले आहे.

हेही वाचा – बदलापूरमध्ये शिवसैनिकांनी स्वतःच्या नगरसेवकाचे कार्यालय तोडले!

२४० पेक्षा जास्त जागा मिळतील

ते पुढे म्हणाले की, “सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधून अनेक जण भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांना माहीत आहे की देशात आणि राज्यात केवळ मोदीच सरकार येणार आहे. दुसऱ्या कोणत्याही पक्षाची सत्ता येणे अशक्य आहे. ‘महायुती’ एकत्र आहे. आम्हाला २४० पेक्षा जास्त जागा मिळतील. वंचित बहुजन आघाडीची अजिबात चिंता नाही,” असे आठवले म्हणाले.

First Published on: September 11, 2019 8:33 PM
Exit mobile version