आमच्यात दम नसता तर शहा, फडणवीस फिरले असते का?

आमच्यात दम नसता, तर अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात कशाला फिरत होते? मी 52 वर्षे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभेतून निवडून येत असे तर काहीतरी काम केले असेल ना? 5 वर्षांपूर्वी अमित शहा यांचे नाव तरी माहिती होते का? ज्याचे नाव कुणाला माहीत नव्हते, तो माणूस आज शरद पवारांनी काय केले?, असे विचारतो, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर घणाघात केला.

बारामती येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांगता सभेमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाईल तिथे सांगतात. आमच्या समोर कोणी पैलवान नाही. त्यांना मी सांगू इच्छितो, आम्ही रेवडी पैलवानासोबत कुस्ती खेळत नाही.

सरकारच्या विरोधात कुणी मतं व्यक्त केली की, त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात येतो. सरकारने उद्योगपतींचे 81 हजार कोटींचे कर्ज स्वत:हून भरले. परंतु आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष केले. महाराष्ट्रातील संबंध तरुण वर्ग आज राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. मी जिथे गेलो, तेथे तरुणांचा मोठ्या संख्येने पाठिंबा मिळाला, असेही शरद पवार म्हणाले. मी ईडीला येतो, येतो म्हणालो तर ते नका येऊ, नका येऊ म्हणाले. पोलीस प्रमुख येऊन आमचे ठरलंय म्हणाले. सत्तेचा गैरवापर करायचा, विरोधकांना तुरुंगात टाकायचे ही भाजपची नीती, असेही पवार म्हणाले.

आमच्या काळात आम्ही पुणे, नाशिक, रांजणगाव, लातूर, नांदेडला कारखाने काढले. सध्या मंदी आहे. तरुणांना रोजगार नाही. ज्यांच्या हातात काम आहे. त्यांच्या नोकर्‍या जात आहेत. 52 वर्षांच्या पूर्वी रोहित एवढाच असताना मी, माझी पहिली निवडणूक लढवली. त्यावेळी बारामती आजच्यासारखी नव्हती. त्यानंतर बारामतीचा चेहरा बदला. अनेक ठिकाणची मुले आज शिकायला येतात. कर्जत-जामखेडची ओळख दुष्काळी भाग होती. एकेकाळी नेहरू-इंदिरा गांधी दुष्काळ पहायला इकडे आले होते. मला विश्वास आहे की तरुणांमुळे एखादा परिसर कसा बदलतो हे पाहण्यासाठी पंतप्रधानांना कर्जत-जामखेडला यावे लागेल, असेही पवार म्हणाले.

First Published on: October 20, 2019 6:51 AM
Exit mobile version