कर्जतमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने सामने !

कर्जतमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने सामने !

रायगड जिल्ह्यामधील सात मतदारसंघात जेथे चुरशीच्या निवडणुका होणार आहेत त्यात कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचा काहीसा वरचा क्रमांक आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सुरूवातीला राजी नसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश लाड पुन्हा एकदा नशीब अजमावत आहेत, तर त्यांच्याकडून गेल्यावेळी पराभूत झालेले त्यावेळचे शेकापचे आणि आता शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे पुन्हा समोर आहेत. त्यामुळे मतदार सुरेशभाऊंचे पुन्हा ‘लाड’ करणार, की महेंद्ररावांची ‘थोरवी’ त्यांना पटणार, यावर आता चर्वितचर्वण सुरू आहे.

यावेळी कर्जतमध्ये शिवसेनेत अनेक प्रमुख कार्यकर्ते इच्छुक होते. मात्र शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा दौरा झाला तेव्हा थोरवे हेच पक्षाचे आणि पर्यायाने महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झाले. खरं तर तेव्हापासून शिवसेनेत अंतर्गत धूसफूस वाढू लागली आणि त्याचा पाहिला फटका हनुमंत पिंगळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर शिवसेनेला बसला. गेल्या निवडणुकीत पिंगळे हे शिवसेनेचे उमेदवार असल्याने नैसर्गिक न्यायाप्रमाणे आपल्याला उमेदवारी मिळावी अशी त्यांची स्वाभाविक मागणी होती, जी मातोश्रीने फेटाळली. सुरेश लाड हेही सुरूवातीला यावेळी निवडणूक लढविण्यास राजी नव्हते. राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेली अंतर्गत खळखळ लक्षात घेऊन लाड तयार नव्हते. नंतर पक्षश्रेष्ठींनी घातलेली समजूत, कार्यकर्त्यांचा आग्रह यामुळे त्यांना निवडणूक लढविणे भाग पडले.

या निवडणुकीत राष्ट्रवादीसह शेकाप आणि काँग्रेस, तसेच अन्य मित्र पक्षांची महाआघाडी असून, अलिबाग आणि पेण येथे काँग्रेसने महाआघाडीचा हात सोडलेला असताना कर्जतमध्ये तो घट्ट पकडून ठेवला असल्याने लाड यांना मित्रपक्षांच्या नाराजीची डोकेदुखी नाही. शेकापची भक्कम ताकद येथे आहे. 2014 च्या निवडणुकीत लाड यांना 57 हजार 13, तर शेकापचे थोरवे यांना 55 हजार 113 मते मिळाली होती. शिवसेनेचे पिंगळे यांना ४० हजार ७२१ आणि भाजपचे राजेंंद्र येरुणकर यांना अवघी 12 हजार 990 मते मिळाली होती. कर्जतमधील सातपैकी पाच जिल्हा परिषद सदस्य आघाडीचे, तर खालापूर तालुक्याचे दोन्ही जिल्हा परिषद सदस्य आघाडीचे आहेत. कर्जतमधील कर्जतसह माथेरान नगर पालिका मात्र महायुतीकडे, तर खालापूर नगर पंचायत आघाडीकडे आहे. खालापूर तालुक्यातील खोपोली नगर पालिकेचा नगराध्यक्ष आघाडीचा, तर बहुमत महायुतीचे आहे.

महाआघाडीची ग्रामीण भागात ताकद आहे, तशी ती शिवसेनेचीही आहे. मात्र महायुतीतील मित्रपक्ष भाजप शिवसेनेच्या उमेदवाराला कुठपर्यंत साथ देणार, हे आज राजकीय तज्ज्ञही सांगू शकणार नाही. गेल्या पाच वर्षांत शिवसेनेत इनकमिंग मोठ्या प्रमाणावर झाल्याचे नाकारता येणार नाही. त्यामुळे थोरवे यांना विजयाची खात्री वाटत आहे. अलीकडे घडलेल्या राजकीय नाट्यात राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे हे स्वगृही परतले आहेत. पिंगळे यांना मानणारा शिवसैनिक त्यांच्याबरोबर असल्याने लाड निश्चिंत झाले आहेत.

कर्जत तालुक्याचा बराचसा भाग दुर्गम असून, तेथे पाहिजे त्या प्रमाणात विकासगंगा पोहचलेली नाही. ही नाराजी लाड यांना भोवणार असे त्यांचे विरोधक सांगत आहेत. परंतु शांत आणि संयमी स्वभावाच्या लाड यांनी तालुक्यासह मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे आणली हेही नाकारता येत नाही. देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार असताना शिवसेनेने मतदारसंघात तुमची ‘थोरवी’ पटावी असे कोणते काम केले ते सांगा, असे आव्हान थोरवे विरोधक देत आहेत.

दोन मातब्बरांतील ही लढत असल्याने सर्वांचेच लक्ष या मतदारसंघाकडे आहेत. दोन्ही बाजू विजयावर ठाम असल्याने सर्वांनाच 24 ऑक्टोबरची वाट पहावी लागणार आहे. सध्या दोन्ही बाजूचा प्रचार शिगेला पोहचत आहे.

First Published on: October 15, 2019 5:17 AM
Exit mobile version