देवेंद्र फडणवीसांच्या हट्टापायी आयारामांच्या हाती धुपाटणे!

देवेंद्र फडणवीसांच्या हट्टापायी आयारामांच्या हाती धुपाटणे!

राज्यात आता काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाशिव आघाडीचे नवे सरकार येण्याच्या मार्गावर असून, लवकरच हे तिन्ही पक्ष सरकार स्थापन करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनेकांच्या हाती धुपाटने राहिले आहे. हे सर्व नेते राज्यात पुन्हा शिवसेना-भाजपचे सरकार येईल या अपेक्षेने भाजपमध्ये गेले होते. मात्र, निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपमध्ये बिनसलं आणि शिवसेनेने थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संपर्क करत सत्ता स्थापनेचा दावा केला. आता राज्यात जरी राष्ट्रपती राजवट लागली असली तरी येत्या काही दिवसांत शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करणार आहेत. मात्र, आता भाजपचे सरकार जाण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हट्ट कारणीभूत ठरला, अशी खंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले काही नेते खासगीत बोलताना बोलून दाखवत आहेत.

मंत्रीपदाच्या आश्वासनामुळे भाजपात प्रवेश

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या काही बड्या नेत्यांना पुन्हा भाजपचे सरकार येईल, असा विश्वास देत सरकार आल्यावर मंत्रीपदावर वर्णी लावू असे सांगितले होते. मात्र, आता सत्ता नाही येणार तर मंत्रीपद कसे काय मिळणार? असे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बड्या नेत्याने खासगीत बोलताना सांगितले. एवढंच नाही, तर देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टापायीच महायुतीला यश मिळूनही सत्ता गमवावी लागत असल्याचे देखील काही नेते खासगीत सांगत आहेत.

यांना होती मंत्रीपदाची अपेक्षा

काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेल्या शिवेंद्र राजे भोसले, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, वैभव पिचड, हर्षवर्धन पाटील, विजयसिह मोहिते पाटील, राणा जगजित सिंह आणि जयकुमार गोरे यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती. मात्र, आता त्यांची ही अपेक्षा देखील पूर्ण होण्याची सुताराम शक्यता नाही. त्यामुळेच सध्या या नेत्यांपुढे डोक्याला हात लावून बसण्यापलीकडे काही उरले नाही. विशेष म्हणजे आता या नेत्यांना सोशल मीडियावरील टीकेचा देखील सामना करावा लागत आहे.

मित्रपक्षही चिंतेत

सगळ्यात महत्वाचे म्हणजे जसे आयाराम चिंतेत आहेत, तशीच काहीशी चिंता भाजप सोबत गेलेल्या मित्रपक्षांना देखील लागली आहे. महादेव जानकर, सदाभाऊ खोत, अविनाश महातेकर यांना भाजपने मंत्रीपदे दिली होती. मात्र, आता शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने आता आपले काय होणार? अशी चिंता या सर्व नेत्यांना लागली आहे. जरी मित्र पक्षातील सर्व नेते चेहऱ्यावर तसे दाखवत नसले तरी त्यांच्या मनात मात्र ही खंत आहे. त्यामुळेच की काय मित्र पक्षातील नेते सध्या माध्यमांशी जास्त बोलणेही टाळत आहेत.

First Published on: November 13, 2019 6:14 PM
Exit mobile version