राज ठाकरे यांच्या भेटीला राष्ट्रवादीचे आमदार

राज ठाकरे यांच्या भेटीला राष्ट्रवादीचे आमदार

राज ठाकरे यांच्या भेटीला राष्ट्रवादीचे आमदार

सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. आज भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची फौज राजभवनवर धडकणार आहे. तिथे ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेटून त्यांच्याशी सत्ता स्थापनेबाबत चर्चा करणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेच्या देखील सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचाच आमदार होईल असे म्हटले आणि ही गोड बातमी स्वत: सुधीर मुनगंटीवार देतील, असेही ते म्हणाले. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन युतीचेच सरकार स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील असे म्हटले आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे. या सर्व घडामोडी होत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगलीचे नवनिर्वाचित आमदार भारत भेलके यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.


हेही वाचा – मी महाराष्ट्रात येणार नाही; देवेंद्रच मुख्यमंत्री – नितीन गडकरी


 

भाजप विरोधात विरोधक एकवटणार?

दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली होती. साधारणत: दहा ते पंधरा मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली होती. विधानसभा निवडणुकीत मनसेला फक्त एका जागेवर यश मिळाले आहे. त्यामुळे मनसे सत्ता स्थापनेत जायंट किलर ठरु शकत नाही. मात्र, जर भाजप विरोधात सर्व विरोधक एकवटले तर राज्यात मोठा भूकंप होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात ही भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळावर सुरु होती. याशिवाय विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी आणि मनसेने एकमेकांना काही जागांवर खुला तर काही जागांवर मागून पाठिंबा दिला होता. बुधवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाणार नाही, असे म्हटले होते. त्याचबरोबर त्यांनी आपण विरोधी बाकावर ठाम असून शिवसेना आणि भाजपला सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले होते. मात्र, पत्रकार परिषदेच्या अखेर शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकते, अशी गुगली पवारांनी टाकली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या आमदारांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न निर्माण झाला.

First Published on: November 7, 2019 1:30 PM
Exit mobile version