रामराजे नाईक निबांळकर यांचाही राष्ट्रवादीला रामराम

रामराजे नाईक निबांळकर यांचाही राष्ट्रवादीला रामराम

रामराजे नाईक निंबाळकर

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला उतरली कळा आली आहे. उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केल्यानंतर आता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही राष्ट्रवादीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. फलटण येथील निवासस्थानी काल, गुरुवार सायंकाळी झालेल्या बैठकीत त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेत प्रवेश करणार असून प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत रामराजे याबाबत अधिकृत घोषणा करतील.

काय झाले फलटण येथील बैठकीत 

या बैठकीत रामराजे, संजीवराजे, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, सदस्य दत्ता अनपट, बाळासाहेब सोळस्कर, मंगेश धुमाळ यांच्यासह फलटण मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून रामराजेंच्या पक्षांतराच्या चर्चा होत्या. अखेरीस गुरूवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

भास्कर जाधवदेखील जाणार शिवसेनेत 

दरम्यान, कोकणात देखील राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी आज सकाळी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिली आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला. भास्कर जाधव हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भास्कर जाधव हे पूर्वी शिवसेनेतच होते. पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. मात्र, आपल्या कर्तृत्वाला राष्ट्रवादीमध्ये फारसा वाव मिळत नसल्याची त्यांची भावना होती. त्यातूनच त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार आज त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.

First Published on: September 13, 2019 12:24 PM
Exit mobile version