काँग्रेसकडून शिवसेनेला आघाडीचं अप्रत्यक्ष आमंत्रण!

काँग्रेसकडून शिवसेनेला आघाडीचं अप्रत्यक्ष आमंत्रण!

एकीकडे राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सत्तास्थापनेवरून मोठं नाट्य सुरू असतानाच विरोधकांनी त्यावर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादावर परखड टिप्पणी केली आहे. ‘ज्यांनी भाजप-शिवसेनेला मतदान केलं, ते मतदारच आता गोंधळून गेले आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये इतका अविश्वास असताना ते सत्ता कशी स्थापन करणार? ज्या प्रकारची वक्तव्य दोन्हीकडची नेतेमंडळी करत आहेत, त्यावरून तरी हेच दिसून येत आहे की या दोघांमध्ये काहीतरी नक्कीच बिनसलंय’, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी साताऱ्यात बोलताना दिली.

‘यांच्यातच विश्वास नाही, सत्ता काय स्थापन करणार?’

‘शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यमध्ये निवडणुकांआधी बरीच चर्चा झाली. त्यानंतर या दोन्ही पक्षांकडून सातत्याने आमचं ठरलंय असंच सांगितलं जात होतं. पण असं वाटतंय की या ‘आमचं ठरलंय’चा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही वेगवेगळा अर्थ काढला असावा. पण त्यांच्यामुळे मतदार मात्र गोंधळून गेले आहेत. त्यामुळे या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन नक्की त्यांच्यामध्ये काय ठरलं होतं, हे जाहीर करायला हवं. जर त्यांच्यात आपापसातच विश्वासाचं वातावरण नसेल, तर ते सत्ता काय स्थापन करणार?’, असं चव्हाण यावेळी म्हणाले.

शिवसेनेला काँग्रेस पाठिंबा देऊ शकते, अशी शक्यता यावेळी चव्हाण यांनी वर्तवली. ‘जर शिवसेना आमच्याकडे पाठिंब्यासाठी प्रस्ताव घेऊन आली, तर आम्ही तो प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे मांडू आणि आमच्या मित्रपक्षांशी देखील चर्चा करू. पण अद्याप अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही’, असं पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.


हेही वाचा – मुख्यमंत्री फडणवीसच, शुक्रवारी घेणार शपथ?

नक्की सरकार कुणाचं?

शिवसेना ५०-५०च्या फॉर्म्युल्यावर ठाम असतानाच दुसरीकडे भाजपकडून देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीसंदर्भात तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. त्यामुळे, आता नक्की कुणाचं सरकार स्थापन होणार? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

First Published on: October 30, 2019 11:52 AM
Exit mobile version