घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री फडणवीसच, शुक्रवारी घेणार शपथ?

मुख्यमंत्री फडणवीसच, शुक्रवारी घेणार शपथ?

Subscribe

मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीसच घेणार असल्याची माहिती आता समोर येत असून शिवसेना देखील सत्तेमध्ये सहभागी असणार आहे असं देखील सांगितलं जात आहे.

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून गेल्या ४ ते ५ दिवसांमध्ये राज्यात घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नक्की पुढचं सरकार कोणाचं येणार? याविषयी मतदारांच्या मनात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्रपक्षांमध्ये वास्तवात ‘काहीच ठरलं’ नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच नक्की मुख्यमंत्री कोण होणार? यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र, आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं समोर येत आहे. येत्या शुक्रवारी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील आणि त्यांच्यासोबत शिवसेना देखील सत्तेत सहभागी होईल यासंदर्भातलं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. त्यामुळे सत्तेच्या वाटाघाटी करण्यासाठी दोन्ही पक्षांकडे आता फक्त दोनच दिवस शिल्लक राहिलेत.

‘…तर चर्चा कसली करायची?’

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिमंडळाच समसमान वाटा या महत्त्वाच्या तत्वावर शिवसेना अडून बसलेली आहे. संजय राऊतांपासून शिवसेनेच्या अनेक नेतेमंडळींनी ही अट मान्य झाल्याशिवाय सत्तास्थापनेची चर्चाच न करण्याची भूमिका घेतली आहे. त्याच आधारावर मंगळवारी होणारी प्रस्तावित शिवसेना-भाजप सत्तास्थापनेसंदर्भातली बैठक शिवसेनेकडून रद्द करण्यात आली. ‘जर कुठला फॉर्म्युलाच ठरला नसेल, तर चर्चा कसली करायची?’ अशी प्रतिक्रिया नंतर संजय राऊत यांनी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यंमत्रीपदाच्या शपथविधीची तयारी करण्यात येत असल्याचं समोर येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला म्हणून भाजप-सेनेची बैठक रद्द-संजय राऊत

दरम्यान, भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना इतर श्रेणीतले अपक्ष पाठिंबा देत आहेत. आत्तापर्यंत भाजपला ८ तर शिवसेनेला ४ अपक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या दोघांची आमदारसंख्या आता अनुक्रमे ११३ आणि ६० झाली आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून शिवसेना देखील सत्तेमध्ये सहभागी असेल, अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचं देखील समजतंय. दरम्यान, याबदल्यात शिवसेनेला कोणती खाती मिळणार, याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि काही मंत्रीपदं मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादी विरोधात बसण्यावर ठाम!

मंगळवारी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ‘५०-५०चा असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नसून पुढची ५ वर्ष मीच मुख्यमंत्री असेन’, असं देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितलं होतं. त्यामुळेच या दोन्ही मित्रपक्षांमध्ये नव्या वादाला सुरुवात होते की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा विरोधातच बसणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सत्तेत शिवसेना-भाजपच येणार हे जवळपास निश्चित झालं आहे.


Video: कोल्हापूरकर तरुणीचं चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरी स्टाईल झणझणीत उत्तर!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -