युती आहे ना; मग जेवणाच्या थाळीचा रेट वेगवेगळा का? – राज ठाकरे

युती आहे ना; मग जेवणाच्या थाळीचा रेट वेगवेगळा का? – राज ठाकरे

भाजप-सेनेच्या थाळीवर राज ठाकरे यांची टीका

शिवसेनेने आपल्या वचननाम्यामध्ये सर्वसामान्यांना १० रुपयांमध्ये जेवण मिळेल अशी घोषणा केल्यानंतर भाजपनेही पाच रुपयांत अटल आहार देऊ असे सांगितले. मात्र यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना-भाजपवर जोरदार टीका केली आहे. ताट-वाट्या घेऊन हे लोकांसमोर जात असल्याचे सांगत महाराष्ट्र भिकेला कसा लागेल? याचा विचार हे दोन्ही पक्ष करत असल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी केला. नवी मुंबई येथे मनसे उमेदवार गजानन काळे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी सभा घेतली होती, यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना-भाजपच्या जाहीरनाम्यासह त्यांच्या जाहीरातीवर देखील टीका केली.

“महाराष्ट्र सध्या भुकानंद असल्याचे म्हणत ताट-वाटीवरून हे दोन्ही पक्ष भांडत आहेत. अरे बाबांनो युतीत आहात ना, मग एकदा काय ते ठरवा ना, पाच रुपये की १० रुपये थाळी”, असा टोला देखील राज ठाकरे यांनी लगावला. तसेच आतापासून हे ताटावरून भांडत असतील तर पुढे काय होईल? असे देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.

हिच ती वेळ, मग आधी वेळ नव्हता का?

दरम्यान राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिच ती वेळ या जाहीरातीवर जोरदार टीका केली. “तुम्हाला आधी वेळ नव्हता का? असा सवाल करत पाच वर्ष तुम्ही काय करत होता, असे म्हणत शिवसनेवर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी फक्त शिवसेनेच्या जाहीरातीवरच टीका केली नाही, तर त्यांनी भाजपच्या जाहीरातीवर देखील टीका केली आहे.

मला सर्वांनी खलनायक ठरवलं 

मी मराठी मुलांसाठी आंदोलन केल्यामुळे या देशात अनेकांनी मला खलनायक ठरवल्याचे सांगत गुजरातमध्ये अल्पेश ठाकोर याने तर भारतीयांना मारझोड करुन हुसकावून लावले. त्याला भाजपमध्ये प्रवेश दिला आणि मला इकडे सर्वानी खलनायक ठरवलं. महाराष्ट्र हितासाठी जो राग येतो, तो मी रस्त्यावर दाखवतो. कोण कुठे येतोय? कोण जातो? याला काही ताळमेळ नसल्याचे सांगत वाढत्या लोंढ्यामुळे आज महाराष्ट्रातील भूमिपूत्रांवर खर्च होणारा पैसा या लोंढ्यावर खर्च होत असल्याचे देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान राज ठाकरे भाषणाची सुरुवात करतानाच सत्ताधारी शिवसेना भाजपवर टीका केली. गेल्या पाच वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी दिल्या त्या यांना पूर्ण करता आल्या नाहीत. तरी या व्यक्ती येतात आणि तुम्हाला तोंड दाखवतात त्यांची हिंमत मानायला हवी, असे सांगत तुम्ही निवडणूक गांभीर्यांने घेत नाहीत म्हणून हे पुन्हा येण्याची हिमंत करतात, असे सांगत यावेळी विचार करून मतदान करा, असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केले.

आमदार-खासदार काय नातेवाईंकासाठी असतात का?

जेव्हा महाराष्ट्रातील तरुण-तरुणी नोकऱ्यांसाठी फिरत असतात तेव्हा कुठे असतात असा सवाल करत हे आमदार-खासदार काय करत असतात असा सवाल देखील त्यांनी विचारला. तसेच आमदार-खासदार हे त्यांच्या जवळच्या व्यक्तीची कामे करण्यासाठी निवडून दिले आहेत का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

First Published on: October 19, 2019 3:07 PM
Exit mobile version