मेहबूबा मुफ्तींसोबत भाजपचे लव्ह जिहाद होते का? – संजय राऊत

मेहबूबा मुफ्तींसोबत भाजपचे लव्ह जिहाद होते का? –  संजय राऊत

खासदार संजय राऊत

भारतीय जनता पार्टी आणि मेहबूबा मुफ्ती यांची विचारधारा जुळणारी नाही. तरीही भाजपने मुफ्तींसोबत जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते. मग मुफ्तींसोबत भाजपचा लव्ह जिहाद होता का? असा प्रश्न शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर टीका केली. सत्ता स्थापनेत पुरेसे संख्याबळ मिळवण्यात भाजपला अपयश आल्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. त्यामुळे सत्ता स्थापनेपासून भाजपने माघार घेतली आहे. मात्र, या अपयशामागे भाजपने शिवसेनेवर खापर फोडू नये, असेही संजय राऊत म्हणाले.

नेमके काय म्हणाले राऊत?

‘मेहबूबा मुफ्ती आणि भाजपचे जे चालत होते त्याला तुम्ही लव्ह जिहाद म्हणणार का? महाराष्ट्रातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हे देशद्रोही पक्ष नाहीत. हे पक्ष पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानच्या मातीत नाही तर या मातीत जन्माला आलेली आहेत. प्रत्येक पक्षाचा आणि त्या पक्षाच्या नेत्यांचा देशाच्या विकासात योगदान राहिलेले आहे. काही मुद्द्यांवर मतभेद असू शकतात आणि असे मतभेद तर आमचे भाजपसोबतही आहेत’, असे संजय राऊत म्हणाले.

राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी कमी वेळ दिला – संजय राऊत

संजय राऊत म्हणाले की, ‘राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करु शकता का? असा प्रश्न विचारला आहे. यासाठी राज्यपालांनी फक्त २४ तासांची मुदत दिली आहे. त्यात कालची रात्र संपली आहे. आता फक्त आजचा दिवस शिल्लक आहे. सत्ता स्थापनेसाठी अनेक लोकांना एकत्र करण्यात वेळ लागतो. त्यामुळे यापेक्षा जास्त वेळ देणे गरजेचे होते. मात्र, तरीही आमची राज्यपालांबाबत काहीही तक्रार नाही.’ यावेळी राऊत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

First Published on: November 11, 2019 10:26 AM
Exit mobile version