भाजपकडे बहुमत असेल, तर खुशाल सत्ता स्थापन करावी – संजय राऊत

भाजपकडे बहुमत असेल, तर खुशाल सत्ता स्थापन करावी – संजय राऊत

‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर बोचरी टीका केल्यानंतर गुरुवारी सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. ‘आम्ही दिलेला शब्द आणि नीतिधर्म पाळतो, भाजपनेही तो पाळावा’, असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे शिवसेना अजून देखील मुख्यमंत्रीपदासह इतर सत्तापदांमध्ये समसमान वाटपाच्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, ‘जर भाजप किंवा इतर कुणाकडेही बहुमत असेल, तर त्यांनी खुशाल सत्ता स्थापन करावी’, असं आव्हान देखील संजय राऊत यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आपणच मुख्यमंत्री होणार अशी भूमिका आक्रमकपणे मांडल्यानंतर शिवसेना मवाळ भूमिका घेणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, संजय राऊतांनी शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे.

७५ अपक्ष निवडून आले आहेत का?

दरम्यान, यावेळी पत्रकारांनी अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्याविषयी विचारलं असता, ‘राज्यात ७५ अपक्ष निवडून आले आहेत का?’ असा सवाल संजय राऊत यांनी केला. ‘मागे एकदा ४५ अपक्ष निवडून आले होते. आता भाजपकडे पर्याय काय आहे? ते काँग्रेसचा पाठिंबा घेणार आहेत की राष्ट्रवादीचा? शिवसेनेला राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या चर्चांवर भाजप म्हणते वाघ गवत खात नाही. मग २०१४मध्ये जेव्हा त्यांना पाठिंबा द्यायला प्रफुल्ल पटेल आले होते, तेव्हा त्यांचा सिंह गवत खात होता का?’ असा खोचक सवाल देखील संजय राऊतांनी यावेळी केला.

दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी भाजपला पुन्हा एकदा युतीची आठवण करून दिली. ‘भाजपला स्वत:च्या जिवावर जनादेश मिळालेला नाही. शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांच्या युतीला हा जनादेश मिळालेला आहे. पण तरी जर भाजपला तसं वाटत असेल, तर त्यांचं स्वागत आहे’, असा टोला यावेळी राऊतांनी लगावला.


हेही वाचा – आता गरज सरो, वैद्य मरो असं झालंय-उद्धव ठाकरे

पर्याय सगळ्यांसमोर असतात

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे इशारा दिला. ‘जर भाजप म्हणत असेल, की आमच्यासमोर पर्याय खुले आहेत, तर त्याचा अर्थ सरळ आहे. शिवसेना काही नवीन पक्ष नाही. भाजपचा राज्याच्या राजकारणात जन्म व्हायच्या आधी २५ वर्ष आम्ही जन्माला आलो. राजकारणात सगळ्यांना पर्याय उपलब्ध असतात. पण उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की मला हे पाप करायचं नाही. ज्यांच्या मनात पाप आहे, ते विकल्पाचा विचार करतात’, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

First Published on: October 31, 2019 10:15 AM
Exit mobile version