घरमहाराष्ट्रआता गरज सरो, वैद्य मरो असं झालंय - उद्धव ठाकरे

आता गरज सरो, वैद्य मरो असं झालंय – उद्धव ठाकरे

Subscribe

सामनाच्या अग्रलेखातून भाजपच्या दुटप्पी धोरणावर टीका करतानाच सत्तास्थापनेविषयीही सूचक निर्देश करण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटला, तरीदेखील नक्की सत्ता कोण स्थापन करणार आहे? याचा सोक्षमोक्ष लागलेला नाही. दोन्ही सत्ताधारी पक्षांना मिळून बहुमत असलं, तरी सत्तापदवाटपाच्या वादात दोघेही अडकले आहेत. त्यातच, भाजपनं लोकसभेवेळी दिलेला शब्द पाळावा, ५०-५० चा फॉर्म्युला अंमलात आणावा अशी मागणी जोरकसपणे शिवसेनेने कालच्या आधीपर्यंत केली होती. मात्र, बुधवारी देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड झाली आणि शिवसेनेनं काहीशी नरमाईची भूमिका घेतली. ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये देखील अग्रलेखात भाजपच्या दुटप्पी धोरणावर टीका जरी केली गेली असली, तरी शिवसेनेची ठाम भूमिका मात्र त्यात दिसून येत नाही. ‘२०१४ साली देशात मोदींच्या नेतृत्वाखाली भव्य यश मिळताच भाजपनं शिवसेनेसोबत युती तोडली.२०१९ला तसंच यश मिळाल्याप्रमाणे ‘गरज सरो, वैद्य मरो’चा दुसरा अंक सुरू झाला आहे, पण हा वैद्य मरणार नाही’, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

मुख्यमंत्रीपद सत्तापद नाही का?

दरम्यान, ‘५ वर्ष मीच मुख्यमंत्री होणार’ असं सांगून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, ‘मुख्यमंत्री’ हे सत्तापद नाही आणि त्याचं समान वाटप करता येणं शक्य नसेल असं कुणाला वाटत असेल, तर त्या बिन सत्तेच्या पदासाठी देशभरात इतका आटापिटा का सुरू आहे? सत्तापदांचे समान वाटप हा शब्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत वापरला. आता मुख्यमंत्रीपद सत्तापदात येत नाही असं कुणाचं म्हणणं असेल, तर राज्यशास्त्राचे धडे नव्याने लिहावे लागतील’ असा टोला अग्रलेखात लगावण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्रीपदाचा म्हणा किंवा समसमान पदवाटपाचा म्हणा, पेच पडला हे नक्की. जर सर्वकाही आधीच ठरलं असेल, तर पेच का पडावा? जे ठरलं आहे, त्यासाठी साक्षीपुराव्यांची गरज नाही. पण सध्या धर्मग्रंथांवर हात ठेऊन लोक शपथेवर खोटं बोलतात असा जमाना आहे. आम्ही दिलेल्या शब्दाला जागतो आणि मानतो’, असं देखील या अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेना विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदेंना पहिली पसंती!

‘भाजपशी शत्रुत्व नाही, मतभेदही नाहीत’

एकीकडे भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर टीका करतानाच पुन्हा ‘भाजपशी शत्रुत्व देखील नाही आणि मतभेदही नाहीत. भगव्या रंगाला आम्ही दोघे मानतो. महाराष्ट्राचा वैचारिक पाया धर्म आणि नीती यावर टिकून आहे. पाया विचारांचा असतो. आम्ही शिवरायांच्या विचाराने आणइ शिवसेनाप्रमुखांच्या प्रेरणेचा वसा घेऊन पुढे जात आहोत. मग पेच पडोत नाहीतर चक्रव्यूह निर्माण होवोत. लढणाऱ्यांना संकटांची पर्वा ती काय?’ असं देखील शेवटी नमूद करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -