मी शिखर बँकेला पत्र पाठवले नाही – शरद पवार

मी शिखर बँकेला पत्र पाठवले नाही – शरद पवार

शरद पवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ईडी नोटीसवर मोठा गौप्यस्फोट केला होता. काही लोकांना कर्ज मिळावे यासाठी शरद पवार यांनी शिखर बँकेला पत्र पाठवले होते. या पत्रांच्या निर्देशानुसार पात्र नसलेल्या लोकांनाही कर्ज देण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ‘न्यूज18 लोकमत’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. मुख्यमंत्र्यांच्या या गौप्यस्फोटावर शरद पवार त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी कधीही कोणत्याही संस्थेला पत्र पाठवलेले नाही, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा – शरद पवारांना ईडीने नोटीस का बजावली? मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

नेमके काय म्हणाले शरद पवार?

‘जिल्हा बँकांना आर्थिक सहाय्य करण्याची जबाबदारी नाबार्डची आहे. अडचणीत आलेल्या बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी नाबार्डने काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. याच गाईडलाईन्सच्या आधारावर राज्य सहकार बँकेने काही संस्थेला मदत करण्याचा निर्णय घेतला. मी बँकेचा संचालक नाही. त्यामुळे या बँकेच्या निर्णय प्रक्रियेशी माझा संबंध नाही. ज्या संस्थांना बँकेने पैसे दिले त्यांच्याशीही माझा काही संबंध नाही. त्याचबरोबर मी कोणत्याही संस्थेला पत्र पाठवलेले नाही. मुख्यमंत्र्यांचे आरोप खोटे आहेत’, असे शरद पवार म्हणाले.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

‘पात्रता नसताना राज्य सहकारी बँकेने काही लोकांना कर्ज दिले. शरद पवार यांच्या निर्देशानुसार कर्ज देण्यात आल्याचा उल्लेख बँकेच्या ठरावात करण्यात आला आहे. काही पत्रे आहेत की ज्यामध्ये पवार साहेबांनी याला लोन द्या असे म्हटले आहे आणि त्याचा आधार त्यांनी घेतला आहे. तर याचा क्रिमिनल अँगल आहे की नाही, ते तपासातून समोर येईल. पवार साहेब असेही म्हणू शकतात की माझ्याकडे आला म्हणून पत्र दिले. पण त्यांनी पत्र दिल्यानंतर या लोकांनी त्या पत्राच्या आधारावर आणि त्याठिकाणी नोंद करुन पवार साहेबांनी निर्देश दिल्याप्रमाणे आम्ही कर्ज देतोय म्हणत बेकायदेशीर कर्ज पास केले आहे. त्यामुळे अशा पत्रांची चौकशी सुरु आहे. त्याचा तपास ईडीकडून सुरु आहे’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

First Published on: October 17, 2019 12:11 PM
Exit mobile version