अखेर समोर आलंच! मोदींनी पवारांना ‘ही’ ऑफर दिली होती!

अखेर समोर आलंच! मोदींनी पवारांना ‘ही’ ऑफर दिली होती!

नरेंद्र मोदी आणि शरद पवार

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत जाणार अशा अनेक अटकळी बांधल्या जात होत्या. त्यासाठी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये अंतर्गत चर्चा झाल्याचं देखील सांगितलं जात होतं. मात्र, ऐनवेळी फासे फिरले आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपऐवजी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. शिवया आपल्यासोबत काँग्रेसला देखील सत्तेत सामील करून घेण्यात शरद पवार यशस्वी झाले. मात्र, असं काय घडलं, की शरद पवारांनी भाजपसोबत न जाता शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला? याचा खुलासा आता खुद्द शरद पवारांनीच केला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला ऑफर दिली होती असं शरद पवार म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले शरद पवार?

दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याच नक्की काय चर्चा झाली, याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, अखेर शरद पवारांनी त्यासंदर्भात गौप्यस्फोट केला आहे. ‘मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑफर दिली होती. तुमच्यासोबत एकत्र काम करायला मनापासून आनंद होईल. सुप्रिया सुळेंनाही मंत्रिमंडळात सहभागी करून घेऊ’, असं शरद पवारांनी सांगितलं आहे. तसेच, ‘मोदींची ऑफर मी नाकारली होती. मी त्यांना सांगितलं की आपली व्यक्तिगत मैत्री ही अशीच कायम राहील. मात्र, तुमच्यासोबत एकत्र राजकीयदृष्ट्या काम करणं मला शक्य नाही’, असं देखील ते म्हणाले. दरम्यान, आपल्याला भाजपनं राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली नव्हती, असं त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.


हेही वाचा – ‘संजय राऊत हनुमान तर शरद पवार चाणक्य’!

अखेर पवारांनीच केला खुलासा!

शरद पवार भाजपच्या पाठिशी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा उभा करतील अशी शक्यता अनेक राजकीय विश्लेषकांनी वर्तवली होती. शेवटपर्यंत पवार काय करतील, याचा अंदाज बांधता येणार नाही, असं देखील काही आमदारच म्हणत होते. या पार्श्वभूमीवर शरद पवारांना भाजपने पाठिंब्यासाठी ऑफर दिली असून त्यासाठी पवारांनी काही अटी ठेवल्या आहेत असं सांगितलं गेलं. यामध्ये सुप्रिया सुळेंसाठी केंद्रात कृषीमंत्रिपद आणि राज्यात देवेंद्र फडणवीसांऐवजी वेगळं नेतृत्व या दोन अटींचा समावेश होता. मात्र, भाजपने त्या अटी मान्य न केल्यामुळे त्यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात होतं. पण आता खुद्द शरद पवारांनीच भाजपची ऑफर आणि त्यांचा नकार याविषयी खुलासा केला आहे.

First Published on: December 2, 2019 9:55 PM
Exit mobile version