मुख्यमंत्र्यांसारख्या दत्तक बापाची नाशिककरांना गरज नाही

मुख्यमंत्र्यांसारख्या दत्तक बापाची नाशिककरांना गरज नाही

स्मार्ट सिटीच्या नावाने शहरांचा चेहरा मोहरा बदलवून टाकू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. महापालिका निवडणुकीत नाशिक शहरही मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले. आता मुख्यमंत्र्यांनीच दत्तक घेतले म्हटल्यावर नाशिकचा चेहरा बदलेल या अपेक्षेने नाशिककर सुखावले मात्र आज काय स्थिती आहे. दत्तक बापाला नाशिकडे लक्ष द्यायला वेळ नाही. इथले उद्योगधंदे बंद पडताहेत. वाढती बरोजगारी अशा एक ना अनेक समस्यांनी नाशिककर त्रस्त आहे त्यामुळे बाप गरीब असला तरी चालेल पण स्वाभिमानी हवा असे सांगत नाशिककरांना उपर्‍या दत्तक बापाची गरज नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला ते नाशिक येथील सभेत बोलत होते.

विधानसभा निवडणुक प्रचाराच्या पार्श्वभुमीवर एकाच मतदारसंघात पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस आमने सामने आले. मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दत्तक घेण्याच्या घोषणेवरून पवारांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. ज्यांना पाच वर्ष सत्ता देवूनही काहीच करू शकले नाही ते आज मला तुम्ही या महाराष्ट्रासाठी काय केले असे विचारत असल्याचे सांगत पवार यांनी मुख्यमंत्र्यांचा वक्तव्याचा समाचार घेतला. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर पैलवान दिसत नाही, या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा शरद पवार यांनी प्रचारसभेत समाचार घेतला. मुख्यमंत्री सांगतात, त्यांचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. कुस्तीच्या राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे. आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही, असं प्रतित्युत्तर पवार यांनी दिले. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या आणि महाराष्ट्राच्या शौर्याची गौरव गाथा गाणार्‍या गड किल्ले भाडोत्री देऊन या ठिकाणी डान्स बार आणि छमछम सुरु करण्याचा सरकारचा डाव असल्याची टीका करून हे सरकार पाडा असे आवाहन पवार यांनी केले. दहशतवादी हल्ला झाला असतांना देशातील सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येत परकीय शक्तीला आळा घालण्यासाठी लष्कराला अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दहशतवादी स्थळे हवाई हल्ले करून उध्वस्त करण्यात आली. मात्र याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपने घेतला. पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश वेगळा इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदावर असतांना केला मात्र त्यांनी कधीही त्याचे श्रेय घेतले नाही.

आजची निवडणूक ही महाराष्ट्रासमोर प्रश्न काय आहे त्यावर आहे. महाराष्ट्रात १६ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. ज्यावेळी महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत होता तेव्हा आघाडी सरकारच्या काळात तात्काळ निर्णय घेऊन शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. आज हजार पाचशे रुपये थकले की त्यावर जप्तीची कारवाई होते. अनेकांवर हजारो कोटी रुपयांचे कर्ज असतांना कारवाई होत नाही. जे सरकार कष्टकरी शेतकर्‍याच्या पाठीशी उभे राहत नाही त्यांना अद्दल घडविण्याची ही वेळ आली असल्याचे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेवून राज्य करत असल्याचे हे सांगतात मात्र शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा धडा ज्या पुस्तकातून विद्यार्थ्यांना देण्यात येत होता तो धडाच या सरकारने काढून टाकला आहे. देशातील तरुण घडविण्यासाठी शालेय जीवनापासूनच त्याचे कर्तृत्वाचे धडे दिले जातात मात्र सद्याचे सरकार मात्र त्याच्या विरोधी भूमिका घेत आहे. महाराष्ट्राच्या गौरवाची गाथा गाणार्‍या गड किल्ल्यांवर दारूचे बार आणि छमछम सुरू करण्याचा या सरकारचा डाव असल्याची टीका त्यांनी केली. नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत अनेकांच्या नोकर्‍या जात आहे. एचएएल सारख्या कंपनीला मिळणारे कॉन्ट्रॅक्ट रद्द झाल्याने अनेक कामगारांवर बेरोजगारीची वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व जागा जिंकू असा विश्वास असून नाशिकरांनी आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. नाशिक जिल्ह्यातील आघाडीतील सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मग पद्मविभूषण कसा दिला

या देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येउन म्हणतात की, पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले? पाच वर्षांपुर्वी हे शहा कोण आहेत हे तरी माहीत होते का? मी गेली ५२ वर्ष संसदिय राजकारणात आहे. विधानसभा, राज्यसभेत मी गेली १४ वर्ष निवडुन आलो. वयाच्या २७ व्या वर्षी मी विधानसभेत प्रवेश केला. मुख्यमंत्री, गृहमंत्री, कृषीमंत्री म्हणून काम केले. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रपती कार्यालयाकडून मला पद्मविभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आणि आता हेच मला विचारताहेत की मी माझं योगदान काय? मग मला माझ्या कार्यसाठी राष्ट्रपती पद्मविभूषण का दिले, असा सवाल करत पवार यांनी शहा यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हणाले पवार …

First Published on: October 17, 2019 11:33 PM
Exit mobile version