मला युती तोडायची नाही, पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच – उद्धव ठाकरे

मला युती तोडायची नाही, पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘सत्ता स्थापन करण्यासाठी ५०-५०चा फॉर्म्युला ठरला होता, त्यानुसार सत्तावाटप व्हावं, मला युती तोडायची नाही. पण भाजपने निर्णय घ्यावा’, अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरेंनी आमदारांच्या बैठकीमध्ये घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या विजयी आमदारांची बैठक आज मातोश्रीवर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सत्तास्थापनेमध्ये शिवसेना नक्की काय भूमिका घेणार? याची उत्सुकता होती. त्यावर अखेर उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेने चेंडू भाजपकडे टोलवला असून भाजपच्या भूमिकेची प्रतिक्षा आहे. दरम्यान, शिवसेनेच्या सर्व आमदारांना पुढील निर्णय होईपर्यंत रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. ‘मला ठरल्यापेक्षा एक कणही जास्त नको. जे ठरलं, ते मान्य असेल तर भाजपनं फोन करावा. पण तसं काही ठरलंच नव्हतं असं तर ते म्हणत असतील, तर चर्चा काय करणार?’ अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरेंनी आमदारांशी बोलताना घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महसूलमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली. त्याचवेळी शिवसेना आमदारांनी मातोश्रीवर बैठक सुरू होती. या बैठकीमध्ये शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी कायम ठेवली असून अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना दिले. त्यामुळे आता शिवसेनेने चेंडू भाजपकडे टोलवला असून भाजपच्या भूमिकेकडे सगळ्याचंं लक्ष आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकाळीच मुंबईत दाखल झाले असून शिवसेना आणि भाजपमधला पेच लवकरच सुटेल आणि पुढचं सरकार महायुतीचंच स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे नितीन गडकरींची डिप्लोमसी तरी हा पेच सोडवू शकेल का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा – मी महाराष्ट्रात येणार नाही; देवेंद्रच मुख्यमंत्री-नितीन गडकरी
First Published on: November 7, 2019 2:09 PM
Exit mobile version