आरे जंगल वाचवणारच – तेजस ठाकरे

आरे जंगल वाचवणारच – तेजस ठाकरे

‘कोणत्याही परिस्थितीत आरे वाचावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझ्यासारखे अनेक पर्यावरण प्रेमी या लढाईत एकत्र आले आहेत’, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दूसरे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. युवासेनाप्रमुख आणि शिवसेनेचे वरळी मतदारसंघाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या प्रचार रॅलीत ते सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी प्रतिक्रिया साधत असताना त्यांनी आरे वृक्षतोडीवर आपली भूमिका स्पष्ट केली. आरे येथील वृक्षतोडीवरुन खुप मोठा गदारोळ झाला. मेट्रो प्रकल्पासाठी आरे येथील २६४६ झाडे तोडण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकारण समितीने घेतला होता. त्यानुसार आरेतील जवळपास २ हजार झाडे तोडण्यात आली. ही झाडे तोडू नये, यासाठी पर्यावरण प्रेमींनी आंदोलने केली. या लढाईत आदित्य ठाकरे देखील उतरले. त्यांनी सोशल मीडियावर वृक्षतोडीवर टीका केली. त्यामुळे भाजप सरकार सोबत महायुतीत करुन सत्तेत राहणाऱ्या शिवसेना पक्षाची आरेबाबत नेमकी भूमिका काय आहे? असा सवाल अनेकांना पडत होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणावर निवडणुकीनंतर बोलू, असे स्पष्ट केले. त्यानंतर आता आरे संदर्भात तेजस ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आरे जंगल वाचवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

२४ तारखेला महाराष्ट्रात भगवा फडकणारच – तेजस

शिवसेना आणि भाजप पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी युती केली आहे. शिवसेनेला १२४ जागा देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात तेजस ठाकरे म्हणाले की, ‘आम्ही फक्त १२४ जागांवर निवडणूक नाही तर आम्ही महायुतीत संपूर्ण जागांवर निवडणूक लढवत आहोत आणि २४ तारखेला महाराष्ट्रात भगवा फडकणारच’. याशिवाय वरळी मतदारसंघात आदित्य हे सर्वाधिक मतधिक्यांनी निवडून येणार, असे देखील ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ आता तेजस ठाकरे देखील राजकीय व्यासपीठावर दिसू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये तेजस आपल्या वडिलांसोबत राजकीय व्यासपीठावर दिसू लागले आहेत. सोमवारी ते आदित्य ठाकरे यांच्या प्रचार रॅलीत होते.


हेही वाचा – हिंमत असेल तर ३७० कलम पुन्हा लागू करण्याची घोषणा करा

First Published on: October 14, 2019 10:04 AM
Exit mobile version