मुक्ताईनगरच्या गौण खनिज उत्खननाची एसआयटी चौकशी होणार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा

मुक्ताईनगरच्या गौण खनिज उत्खननाची एसआयटी चौकशी होणार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा

नागपूर : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे सातोड येथील टेकडीतील गौण खनिज उत्खननप्रकरणी विशेष चौकशी समिती अर्थात एसआयटी नेमून चौकशी केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केली.

जळगाव जिल्ह्यातील अपक्ष आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांनी या प्रकरणी आज लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. सर्व प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करून टेकडी खोदण्यासाठी सर्व परवानग्या देण्यात आल्या. यात सुमारे ४०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला.

यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विखे पाटील यांनी येत्या १५ जानेवारीपर्यंत वाळू उत्खननासाठी राज्याचे सर्वंकष धोरण आणले जाईल. त्यात सर्वसामान्य जनतेला सरकारी डेपोतून वाळू मिळण्याची व्यवस्था असेल, असे सांगितले. तसेच बेकायदेशीररीत्या वाळू उत्खननासाठी आधीच्या सरकारकडून प्रोत्साहन देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

परवानगीपेक्षा जास्तीच्या परिमाणाचे गौण खनिजाचे उत्खनन आढळून आल्यास कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याबाबत उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जळगाव यांना उक्त गटातून संबंधित कंपनीने किती ब्रास गौण खनिजाची खरेदी केली, याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना २४ डिसेंबरच्या पत्राद्वारे सूचना करण्यात आल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

कर्जत तालुक्यात एमआयडीसी : उदय सामंत

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एमआयडीसी स्थापन करण्यासाठीची अधिसूचना हे अधिवेशन संपण्यापूर्वी जारी करण्यात येईल आणि भूसंपादन करण्याची कारवाई करण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज अन्य एका लक्षवेधी सूचनेच्या  उत्तरात विधानसभेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.


हेही वाचाः जयंत पाटील यांचे निलंबन रद्द करा; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

First Published on: December 26, 2022 6:21 PM
Exit mobile version