Monday, April 29, 2024
घरमानिनीWomen's Day : पाटील काकी... बस नाम ही काफी है!

Women’s Day : पाटील काकी… बस नाम ही काफी है!

Subscribe

मुंबईसह अनेक शहरांत प्रत्येक चार घरांमागे एका घरात लहान मोठा गृहउद्योग सुरू असतो. दिवाळीचा फराळ बनवून देण्यापासून ते सकाळ नाश्ता किंवा संपूर्ण खानावळ चालवण्याचा हा उद्योग. या उद्योगात खासकरून महिलांचं प्रमाण अधिक आहे. घरचा आर्थिक डोलारा सांभाळण्याकरिता आपल्या हाती असलेल्या पाककौशल्याचा वापर करण्यास वाव देणारा हा गृहउद्योग. पण या गृहउद्योगाचा विस्तार मर्यादित राहतो. फार फार तर चाळीबाहेर, वेशीबाहेर किंवा अगदीच यश मिळालं तर शहराबाहेर आपला पदार्थ विकला जातो. पण या उद्योगाला पॅन इंडिया महत्त्व मिळत नाही. पॅन इंडिया यशस्वी गृहउद्योग अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. त्यात आता अभिमानाने नाव घ्यावं लागेल ते आपल्या मराठमोळ्या पाटील काकींचं. नावातच आपलेपणा जपणाऱ्या पाटील काकींच्या लाडू, चकलीतही तितकीच माया भरलेली असते. त्यामुळे बायकी कामांना कमी लेखणाऱ्या समाजात गीता पाटील यांचं कौतुक केल्यास आजचा महिला दिन खऱ्या अर्थी सार्थकी लागेल.

आपल्या प्रत्येकाच्या चाळीत, इमारतीत, सोसायटीत एक पाटील काकी असतेच. जी छान चांगलंचुंगलं जेवण बनवून गरजूंना तृप्त करत असते. अशीच एक पाटील काकी राहते मुंबईच्या सांताक्रूझ विभागात. नवऱ्याची नोकरी गेल्यावर डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा तिने ते हात कामात गुंतवले आणि सुरू केले नाश्ता सेंटर. हाती असलेल्या पाककौशल्यामुळे ग्राहकांच्या पोटातून मनात उतरायला गीता पाटील यांना वेळ लागला नाही. त्यांनी अल्पावधीतच आपला ग्राहकवर्ग आकर्षून घेतला.

- Advertisement -

गीता पाटील सांगतात, नवऱ्याची नोकरी गेली तेव्हा महिन्याचा घरखर्च भागवणं कठीण झालं होतं. माझी आई उत्तम सुगरण होती. तिच्यातील ही कला माझ्याही हाती उतरली. सणावाराला आम्ही काही बनवलं की, आजूबाजूच्यांना द्यायचो. त्यांना ते आवडायचं. त्यामुळे नवऱ्याची नोकरी गेल्यानंतर मी माझ्या याच कलेला जगण्याचं साधन केलं. सुरुवातीला आम्ही सकाळचा नाश्ता करून विकत होतो. व्यवसाय सुरू केला तेव्हा चांगला प्रतिसाद मिळाला. बाजूलाच असलेल्या सरकारी कार्यालयातही नियमित नाश्त्याचे डबे पोहचवू लागलो. तिथले कर्मचारी, अधिकारी माझ्या हातचा नाश्ता खाऊन तृप्त होत असत. त्यामुळे मला काम करण्यास अधिक हुरूप आला. पण, संघर्ष नसेल तर, तो व्यवसाय कसला? ज्या सरकारी कार्यालयात नियमित नाश्त्याचे डबे पोहोचवायचो, तिथे आम्हाला अडवण्यात आलं. बाहेरचे अन्नपदार्थ आतमध्ये नेण्यास मनाई केली गेली. पण सुदैव म्हणजे माझ्या हातची चव सर्वच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या जीभेवर रेंगाळली असल्याने त्यांनीच पुढाकार घेऊन आतमध्ये डबे पोहोचवण्यासाठी अधिकृत परवानगी काढली. त्यामुळे व्यवसाय सुरळीत झाला. परंतु, रोज चार माळे चढून उतरून माझं शरीर कमकुवत बनत गेलं. मी आजारी पडू लागल्याने कालांतराने सरकारी कार्यालयात जाणं बंद केलं. पण रोजच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी करणं भाग होतं. त्यामुळे घरच्या घरी नाश्ता सेंटर सुरू केलं. हे नाश्ता सेंटर व्यवस्थित सुरू असतानाच २०२० मध्ये कोरोनाने शिरकाव केला. यामुळे आमचा व्यवसाय खंडित झाला. ग्राहक घटले. पुन्हा महिन्याच्या घरखर्चाचा हिशोब कोलमडला. शिक्षण, भाडं… सगळं अवाक्याबाहेर गेलं. पण, एवढ्यावरच थांबायचं नव्हतं. जगच ठप्प झाल्याने कमवण्याचं दुसरं साधनही उपलब्ध नव्हतं. लॉकडाऊन काळात सगळं ठप्प झालेलं असताना फक्त ऑनलाइन व्यवहार तेवढे सुरळीत होते. कोणी प्रत्यक्षात एकमेकांशी बोलत नव्हतं, पण ऑनलाइन जग सुरू होतं. या ऑनलाइन जगात तुम्ही काहीही विकत घेऊ शकत होतात. मग, माझ्या मनात विचार आला की, आपण ऑनलाइन विक्री करू शकतो. माझा मुलगा विनित याला हे सांगितलं,” पाटील काकी फार उत्साहाने सांगत होत्या.

पाटील काकींचा मुलगा विनित. अवघ्या २३-२४ वर्षांचा तरुण. आईवडिलांच्या कष्टांची जाणीव असल्याने त्याने आईच्या सल्ल्याचा सकारात्मक विचार केला. त्याने आईची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं ठरवलं. तो वेब-डेव्हलपर होता. आयटी क्षेत्रातलं शिक्षण आणि अनुभव असल्याने त्याने त्याचं कौशल्य पणाला लावलं. आभासी वाटणाऱ्या या दुनियेत स्वतःचं अस्तित्त्व टिकवायचं असेल तर त्यावर स्वतःची ओळख असणं गरजेचं असतं. त्यासाठी वेबसाइट महत्त्वाची. विनितने अभ्यासपूर्ण, ग्राहकांना वापरण्यास सोपी अशी वेबसाइट तयार केली. वेबसाइटमुळे हा व्यवसाय पॅन इंडियात पोहोचला. कालपर्यंत गल्लीतील ऑर्डर स्वीकारणाऱ्या काकी आता त्यांचं उत्पादन थेट दिल्लीतही पाठवू शकतात.

- Advertisement -

पाटील काकी या वेबसाइटच्या माध्यमातून दीर्घकाळ टिकणारे पदार्थ विकतात. लाडू, चकल्यांसारखे फराळ दीर्घकाळ राहतात; त्यामुळे हे पदार्थ जास्त विकले जातात. हळूहळू व्यवासायाचा पसारा वाढत गेला. पदार्थांचा दर्जा चांगला असल्याने ग्राहकवर्ग आकर्षित होत गेला. यामुळे ऑर्डर्स वाढू लागल्या. सुरुवातीला पाटील काकी आणि पती दोघेच पदार्थ बनवत असत. नंतर ऑर्डर्स वाढल्याने दोघांनाही काम करणं अशक्य झालं. व्याप वाढल्याने हे सगळं सोडून द्यावंस वाटलं. पण मुलाने धीर दिला. व्यवसाय बंद करण्यापेक्षा आपण कामगार ठेवू असा सल्ला दिला. त्यामुळे सुरुवातीला शेजारच्याच गरजू बायकांना रोजगार उपलब्ध करून दिला. लॉकडाऊन काळात तसेही अनेकांचे रोजगार ठप्प झाले होते. त्यामुळे मला गरजू महिला मिळाल्या. सुरुवातीला दोन महिलांना कमी पगारावर ठेवलं. या महिलांनीही सकारात्मकता दाखवली. हळूहळू महिलांची संख्या वाढत गेली. जागाही लहान पडू लागली. त्यामुळे जागाही बदलली, असं बरंच काही पाटील काकी सांगत राहिल्या.

आमच्याकडून अनेकांना आर्थिक मदत होते याचं मला समाधान आहे. लॉकडाऊन काळात आमचा घरखर्च चालवणं कठीण होतं, पण आज मी माझ्या गृहउद्योगातून इतरांच्या घराला हातभार लावू शकते, याचा आनंद आहे, असं पाटील काकी अभिमानाने सांगत होत्या. आज ‘पाटील काकी’ कंपतीन ५० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. व्याप वाढत गेल्याने पाटील कुटुंबीयांना अधिकच्या भांडवलाची गरज लागली होती. त्यामुळे पैसा कुठून उभा करायचा हा प्रश्न होता. परंतु, या काळातही विनितचा मित्र दर्शिल याने मदत केली. गृहउद्योग मर्यादित राहू नये, याकरिता विविध प्रयत्न सुरू होते. विनित आणि त्याचा भागीदार मित्र दर्शिल सावला यांनी अभ्यास सुरू केला. त्यातूनच त्यांना शार्क टॅन्क इंडियाबाबत कळलं. त्यांनी लागलीच यासाठी प्रयत्न सुरू केले. आपल्या व्यवसायाला शार्क टॅन्क इंडियाचं व्यासपीठ मिळालं तर, मोठी क्रांती होईल, हे या दोघांनीही हेरलं होतं. त्यामुळे तिथवर पोहोचण्यासाठी जे प्रयत्न अपेक्षित आहेत त्यादृष्टीने त्यांनी प्रवास सुरू केला. या दोघांच्याही प्रयत्नांना यश आलं आणि शार्क टॅन्कमध्ये पाटील काकीने विजय मिळवला. संकल्पना, नियोजन, व्यवस्थापन आवडल्याने त्यांना तब्बल ४० लाखांची गुंतवणूक मिळाली. फक्त गुंतवणूकच नाही तर प्रसिद्धी आणि प्रसिद्धीमुळे ग्राहकवर्गही मिळाला. शार्क टॅन्क इंडियामधील त्यांचा कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर देशभरातून त्यांना प्रतिसाद मिळू लागला. इतका प्रतिसाद मिळाला की त्यांची वेबसाइट क्रॅश झाली.

व्यवसायात नवनवे प्रयोग करून पाहावे लागतात. तसेच अनेक प्रयोग पाटील काकीमार्फत केले जातात. चकली, लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, पुरणपोळी अशा पदार्थांसोबतच आणखी काय ठेवता येईल, यासाठी सध्या चाचपणी सुरू आहे. तसंच, हे पदार्थ विविध दुकांनामध्ये कसे उपलब्ध करता येतील त्यादृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. व्यवसाय वाढत गेला तरी पाटील काकींचे पाय जमिनीवर राहिले. पाटील काकी आजही गळ्यात अॅप्रन, डोक्यावर कॅप घालून किचनमध्ये उभ्या राहतात आणि केवळ ऑर्डर्स न सोडता लाडूसुद्धा वळतात. “आपल्या अंगातील कलागुणांना वाव द्या. फक्त चूल आणि मूल न राहता आपल्या कलागुणांना व्यासपीठ निर्माण करा,” असं पाटील काकी आवर्जून समस्त महिला वर्गांना सांगतात.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -

Manini