Navratri 2021 : अलिबागच्या मूक-बधीर संजीव मोरेची कमाल ; नारळावर साकारतोय देवीची मूर्ती

Navratri 2021 : अलिबागच्या मूक-बधीर संजीव मोरेची कमाल ; नारळावर साकारतोय देवीची मूर्ती

Shardiya Navratri 2021 : अलिबागच्या मूक-बधीर संजीव मोरेची कमाल ; नारळावर साकारतोय देवीची मूर्ती

शारीरिकदृष्ट्या सक्षम असतानाही निसर्गाने त्याच्यावर अन्याय केला. जन्मतःच त्याची वाणी आणि ऐकण्याची क्षमता हिरावून घेतली. पण या व्यंगांवर मात करून तो उत्तम कलाकृती साकारून सर्वांगाने सक्षम असणार्‍यांना तोंडात बोटे घालायला भाग पाडतो. या कलाकाराचे नाव आहे, संजीव मोरे. तालुक्यातील सारळ फुफादेवीपाडा गावचा हा तरुण असून, या नवरात्रोत्सवात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

संजीवने नारळावर देवीचे चित्र साकारले आहे. नवरात्रोत्सवात घटस्थापना करताना कलशावर नारळ ठेवला जातो. मग त्यावर फुलापानांच्या माळा बांधल्या जातात. परंपरेने चालत आलेल्या प्रथेला आणखी आकर्षक आणि जिवंत रूप देण्याचे काम त्याने नारळावर साकारलेल्या देवीच्या चित्रातून केले आहे. असे म्हणतात की, देव कोणावर अन्याय करत नाही. प्रत्येकाला त्याच्या दरबारी न्याय मिळतो. संजीवच्या बाबतीत हे सत्य आहे. जरी त्याला बोलता, ऐकता येत नसले तरी तो सामान्य आयुष्य जगतो. तो उत्तम गणेश मूर्तीकार आहे.

तसेच तो उत्तम चित्रकार देखील आहे. चित्रकलेचे कोणतेही प्राथमिक शिक्षण नसताना तो हुबेहूब चित्र काढतो. मुंबई, ठाणे या मोठ्या शहरात, तसेच रायगड जिल्ह्यातील रामराज, नागोठणे, रेवस येथील गणेशमूर्ती कला केंद्रांतून त्याने अनेक मूर्ती साकारल्या आहेत. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून त्याने नारळावर देवीचे चित्र काढण्यास सुरुवात केली. गावात आणि पंचक्रोशीतील अनेकजण त्याच्या या मूर्तीचे नारळ खरेदी करतात आणि घटस्थापनेत तो पूजतात. त्याच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या कलेमागील प्रेरणा पत्नी संजना, बहीण आशा सुतार यांच्यासह ग्रामस्थ आहेत. त्याच्या कलेचा शासन दरबारी सन्मान व्हावा, अशी माफक अपेक्षा पत्नी आणि बहिणीने व्यक्त केली आहे.

                                                                                              वार्ताहर – रत्नाकर पाटील


हे ही वाचा – Navratri 2021: तुळजाभवानी मंदिरात VIP दर्शन बंद, संस्थानाकडून नवीन नियमावली जाहीर


 

First Published on: October 12, 2021 1:08 PM
Exit mobile version