Corona Live Update: आकडा वाढला, देशात १,२५१ पॉझिटिव्ह रुग्ण, ३२ रुग्णांचा मृत्यू

Corona Live Update: आकडा वाढला, देशात १,२५१ पॉझिटिव्ह रुग्ण, ३२ रुग्णांचा मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देसातील कोविड १९ विषाणूमुळे संक्रमित झालेल्यांची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. सध्या भारतात तब्बल १,२५१ रुग्ण पॉझिटिव्ह असून यापैकी ३२ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १०१ लोकांची प्रकृती सुधरल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ICMR ने सांगितल्याप्रमाणे देशात आतापर्यंत ३८,४४२ टेस्ट झाल्या आहेत. यापैकी ३,५०१ टेस्ट २९ मार्चला केल्या गेल्या आहेत.


मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग

9.40 PM – मंत्रालयाच्या चौथ्या मजल्याला आग लागली असून सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या दालना जवळ शॉर्टसर्किट झाल्याचे कळते आहे.

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सोमवारी रात्री शॉर्ट सर्किट झाले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाहणी केली असता तेथे केवळ एसी मध्ये शॉर्टसर्किट झाले असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने विद्युत प्रवाह खंडित करून शॉर्टसर्किट चे काम करण्यात आले.

मुख्यमंत्री सहायता निधीकडे ओघ सुरु, दोन दिवसात १२.५० कोटी जमा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा  मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात  दानशूर व्यक्ती व् संस्थानी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून गेल्या दोन दिवसांत १२ कोटी  ५० लाख रुपये या खात्यात जमा झाले आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. याशिवाय २० तारखेपासून आजतागायत  सीएसआर  निधीतून तसेच देणगी स्वरुपात कोरोना आपत्ती व्यवस्थापनाकडे अनेक उद्योग व् संस्थानी मदत देणे सुरु केले आहे.

मुंबईत आणखी एक मृत्यू; राज्यात कोरोनाचे १० बळी

6.00 PM – कोरोनाचे थैमान मुंबई आणि महाराष्ट्रात सुरुच आहे. मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयातील एका ८० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता. आज त्याची कोविड १९ ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे समोर आले आहे.

 


5.18 PM – भारतात मागच्या २४ तासात ९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आता भारतात एकूण १०७१ रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झालेला आहे.

डोंबिवलीत अजून एकाला कोरोनाची लागण, एकूण आकडा ११!

3.24 PM – डोंबिवलीतल्या अजून एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट. कल्याण-डोंबिवलीतल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ११वर, रुग्णावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू.

1.50 PM – नागपूरच्या शासकीय रुग्णालयातल्या डॉक्टरांनाच कोरोना झाल्याचा संशय, ९ डॉक्टरांना आयसोलेशनमध्ये ठेवलं. अहवाल येण्याची प्रतिक्षा!

1.43 PM – पुण्यात कोरोनाचा पहिला बळी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू होता. या मृत्यूसह भारतातल्या एकूण बळींची संख्या ३० झाली आहे. यातले ८ बळी महाराष्ट्रात गेले आहेत.

1.03 PM – मुंबईतला वरळी-कोळीवाडा परिसर पोलिसांनी केला सील. पालिकेकडून संपूर्ण परिसराचं निर्जंतुकीकरण सुरू. वरळी-कोळीवाड्यात संशयित कोरोना रुग्ण या परिसरात आल्याचा संशय आल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून या संपूर्ण परिसराचं सॅनिटायझेशन केलं जात आहे. पोलिसांच्या संरक्षणात हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पालिकेकडून या भागामध्ये घोषणा केली जात आहे की कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे इथे निर्जंतुकीकरण केलं जात आहे.

11.36 AM – कोरोनाचा लढा देण्यासाठी पोलिसांना कारवाईचा वापर करायला भाग पाडू नका, घरातच राहा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांना केलं आहे. त्याशिवाय, कोरोनानंतर येणाऱ्या संकटाविषयी देखील शरद पवारांनी जनतेला इशारा दिला आहे.

CoronaVirus : शरद पवार म्हणतात, ‘पुढचा काळ काटकसरीचा असणार’!


10.29 AM – देशभरातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हजारपार. देशभरात ११५२ लोकांना कोरोनाची लागण. तर मृतांचा आकडा २८वर. पश्चिम बंगालमध्ये एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू.

10.23 AM – केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गाबा यांनी लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ‘अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत याचं मला आश्चर्य वाटत आहे. देशात लॉकडाऊनचा २१ दिवसांचा कालावधी वाढवण्याचा केंद्र सरकारचा सध्या कोणताही विचार नाही’, असं ते म्हणाले आहेत.

9.38 AM – महाराष्ट्रात कोरोनाचे १२ नवे रुग्ण. पुणे ५, मुंबई ३, नागपूर २, कोल्हापूर-नाशिक प्रत्येकी १. राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २१५वर

8.45 AM : मालकाने काढलं बाहेर; पती गर्भवती पत्नीला घेऊन १०० किमी चालला

कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनमुळे कोट्यवधी स्थलांतरित मजूर बेरोजगार झाले आहेत. आणि त्यांना शहरात राहण्यासाठी काहीच साधन नसल्यामुळे शेकडो किलोमीटर पायी त्यांच्या गावी जाण्यास भाग पडलं आहे.

इथे क्लिक करून वाचा सविस्तर!


अमेरिकेत कोरोनामुळे १ ते २ लाख बळी जाऊ शकतात, ज्येष्ठ शास्त्रज्ञाचा अंदाज!

 


8.05 AM – पुण्यात अजून दोघांना कोरोनाची लागण. पण धक्कादायक बाब म्हणजे मार्केटयार्ड भागातल्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले. संभाव्य फैलावामुळे प्रशासन चिंतेत!


8.04 AM – वाशीच्या APMC मार्केटमध्ये आज फक्त ५० ते ६० गाड्यांची आवक; आधीच्या मालाला मागणी कमी झाल्यामुळे आज कमी मालाची आवक!


7.32 AM – जगभरात आत्तापर्यंत कोरोनामुळे ३४ हजार बळी; एकट्या इटलीमध्ये गेल्या २४ तासांत ७४९ मृत्यू!


7.32 AM – देशभरात कोरोनाबाधिकांचा आकडा ९ हजार ९३९ वर, बळींची संख्या २७ वर!


7.31 AM – महाराष्ट्रातल्या कोरोना बाधितांचा आकडा २०५ वर


7.27 AM :  जगभरात कोरोनाचं थैमान सुरू असताना अमेरिकेत त्याचं भीषण रूप पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत अमेरिकेत १ लाख ४२ हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय आत्तापर्यंत शेकडो लोकांनी अमेरिकेत कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. येत्या काही दिवसांत अमेरिकेत बळींची संख्या २ लाखांपर्यंत वाढू शकते असा अंदाज अमेरिकेतल्याच सरकारी संस्थांकडून वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत लॉकडाऊनचा काल ३० एप्रिलपर्यंत वाढवली आहे. जगभरात लाखो लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अवघं जगच कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. इटलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून दर २४ तासांत ६०० ते ७०० बळी जात असल्यामुळे इटलीमध्ये तर कोरोनाने अक्षरश: हैदोस घातल्याचं चित्र दिसून येत आहे.

First Published on: March 30, 2020 11:31 PM
Exit mobile version