Corona Live Update: राज्यात २६८२ नव्या रुग्णांची नोंद; ११६ जणांचा मृत्यू

Corona Live Update: राज्यात २६८२ नव्या रुग्णांची नोंद; ११६ जणांचा मृत्यू

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी राज्यात १०० हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ११६ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची राज्यातली संख्या २०९८ झाली आहे. त्यासोबतच आज राज्यात तब्बल २ हजार ६८२ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ६२ हजार २२८ झाला असून त्यातले ३३ हजार १२४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा २६ हजार ९९७ झाला आहे. (सविस्तर वाचा)
उल्हासनगरातील ८० टक्के खाजगी दवाखाने बंद भाजपा नगरसेवकाकडून फिरत्या दवाखान्याची व्यवस्था शहरात ५ फिरते दवाखाने फिरणार आहे. कोरोना प्रादुर्भावच्या भितीने आणि पालिकेने काही अटी शर्ती लागू केल्याने उल्हासनगरातील ८० टक्के खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद केले आहेत. त्यावर पर्याय किंबहूना उपाय म्हणून भाजपा नगरसेवक मनोज लासी यांच्या पुढाकाराने फिरत्या दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी या लहानसहान आजारावर औषध घेण्यासाठी नागरिक धाव घेऊ लागले आहेत.

आता लॉकडाऊनची जबाबदारी त्या त्या राज्यावर देण्याची शक्यता!

पुन्हा १५ जूनपर्यंत केंद्र सरकार लॉकडाऊन वाढवण्याच्या विचारात असून, ३१ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉकडाऊन ५ ची घोषणा करतील. (सविस्तर वाचा)


कर्मचाऱ्यांच्या सतर्कमुळे एसटीत कोरोनाचा आकडा ‘शून्य’

एसटी महामंडळाच्या कर्तव्यांवर असलेल्या एकही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फिजिकल डिस्टिंसिग काटेकोर पालन आणि कर्मचाऱ्यांना सतर्कमुळेच हे शक्य झाले आहे अशी, माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)


लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार

लॉकडाऊनचा ५ वा टप्पा देशातील लोकांच्या खिशाला परवडणारा नाही अशी शक्यता आहे. या काळात लॉकडाऊनमध्ये संभाव्य सूट मिळाली तरी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविण्याची दाट शक्यता आहे. तज्ञांच्या मते, ही वाढ प्रति लिटर ५ रुपयांपर्यंत होणार आहे. सरकारी तेल कंपन्यांची बैठक गेल्या आठवड्यात झाली होती. ज्यामध्ये दररोज पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमध्ये सुधारणा करण्याबाबतही चर्चा झाली होती. देशात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरील व्हॅटमध्ये दिल्ली सरकारसह देशातील अनेक राज्यांनी वाढ केली आहे. (सविस्तर वाचा)

इतिहासात पहिल्यांदाच आषाढी वारी रद्द!

राज्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी एकत्र येणार असलेल्या पंढरीच्या वारीचं काय होणार? यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यावर आता पडदा पडला असून इतिहासात पहिल्यांदाच आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. थेट आषाढी एकादशीच्याच दिवशी ज्ञानोबा माऊलींच्या पादुका पंढरपूरला हेलिकॉप्टर किंवा वाहनाच्या माध्यमातून पोहोचवल्या जातील असा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात वारकरी भक्तगणांसाठी विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातलं दर्शन २४ तास ऑनलाईन पद्धतीने होत राहील, असं देखील जाहीर करण्यात आलं आङे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहनीनाथ महाराज औसेकर, प्रांत अधिकारी सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि मंदिर समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. (सविस्तर वाचा)

कोविड रूग्णालयांसाठी नाशिकमध्ये साहित्य निर्मिती

एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण आणि दुसरीकडे रुग्णालयाची अपुरी संख्या यामुळे शासनाकडून शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालये अधिग्रहीत करण्यात आली आहेत. भविष्यात परिस्थिती आणखी बिकट झाल्यास वेगळे पर्याय शोधावे लागणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकार आणि राज्य शासनाने बांधकाम साहित्य निर्मिती क्षेत्रात काम करणार्‍या एव्हरेस्ट समुहाच्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर औद्योगिक वसाहतीतील प्लँटला तात्पुरती कोविड रुग्णालये उभारण्यासाठी लागणार्‍या साहित्य निमिर्तीची विशेष परवानगी दिली आहे. (सविस्तर वाचा)
भारतानंतर आता चीनने देखील ट्रम्प यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. भारत आणि चीनच्या वादात तिसऱ्याची मध्यस्थी नको आहे, असे मत चीनने व्यक्त केले आहे.  
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कुख्यात डॉन अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला.  
लॉकडाऊ वाढवायचा की नाही? याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी घोषणा करतील. गेल्या अडीच महिन्यांपासून अर्थचक्र ठप्प आहे. आर्थिक संकटातून राज्याला मार्ग काढावा लागणार आहे, यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे बोलताना सांगितले.
देशात ज्या पद्धतीने कोरोना व्हायरसचा आलेख वाढत आहे. ते पाहता लॉकडाऊन आणखी १५ दिवसांसाठी वाढविण्यात यावा, अशी मागणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या संभाषणात आपण लॉकडाऊन वाढविण्यासोबतच रेस्टॉरंट सुरु करण्याची मागणी केली आहे. सोशल डिस्टसिंगचे नियम पाळत ५० टक्के ग्राहकांच्या उपस्थितीत त्यांना परवानगी द्यावी, तसेच जीम सुरु करण्यात यावी, अशीही अनेक नागरिकांची मागणी असल्याचे प्रमोद सावंत यांनी सांगितले. गोव्यात सध्या ६९ रुग्ण असून त्यापैकी ३१ अॅक्टिव्ह केसेस आहेत.    
देशात एका दिवसात पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचा रोज नवीन रेकॉर्ड बनत आहेत. कालच्या २४ तासांत देशात ७,४६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. एका दिवसांत आढळणाऱ्या रुग्णांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १ लाख ६५ हजार ७९९ वर पोहोचली आहे.
जगातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ५९ लाख चार हजार ६५८वर पोहोचला आहे. त्यापैकी तीन लाख ६२ हजार १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत २५ लाख ७९ हजार ६२९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा १७ लाख ५८ हजार ४२२वर पोहोचला असून मृतांचा आकडा एक लाख दोन हजार ९१७ झाला आहे.
राज्यात गुरुवारी २५९८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५९ हजार ५४६ झाली आहे. तर राज्यात ८५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १९८२वर पोहचली आहे. असे असले तरी राज्यातील कोरोना मृत्यू दर ३. ३२ टक्के इतका आहे. तसेच ६९८ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने आजपर्यंत १८ हजार ६१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३१.२६ टक्के एवढे आहे.
First Published on: May 29, 2020 3:05 PM
Exit mobile version