दिवेआगारचा सुवर्ण गणेश २३ नोव्हेंबरला पुन्हा विराजमान होणार

दिवेआगारचा सुवर्ण गणेश २३ नोव्हेंबरला पुन्हा विराजमान होणार

दिवेआगरचा सुवर्ण गणेश २३ नोव्हेंबरला पुन्हा विराजमान होणार

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुवर्ण गणेशमूर्तीची पुनःप्रतिष्ठापना २३ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अंगारकी चतुर्थीचा हा योग साधणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते खा. सुनील तटकरे यांनी दिली.अलिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार तटकरे यांनी ही माहिती दिली. गणेशाच्या प्रतिष्ठापनेमुळे या परिसराला आणि दिवेआगरला पर्यटनाचे महत्व पुन्हा अबाधित राहील, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. दिवेआगर येथील गणपतीची सोन्याची मूर्ती चोरीला गेली होती. या घटनेला जवळपास १० वर्षांचा अवधी उलटला आहे. चोरीला गेलेला माल पोलिसांनी जप्त केला आहे. मंदिरावर दरोडा टाकणार्‍या दरोडेखोरांना शिक्षादेखील झाली आहे. मात्र त्यांनी ही मूर्ती वितळवल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. तो सर्व गुंता आता सुटला आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरला सुवर्ण गणेश पुन्हा एकदा आपल्या मंदिरात विराजमान होणार आहे. खा. सुनील तटकरे यांनी यासाठी प्रचंड पाठपुरावा केला. दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरामध्ये २४ मार्च २०१२ रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी, महादेव गोपाळ घडशी आणि अनंता बापू भगत या दोन सुरक्षारक्षकांची हत्या करुन मंदिरातील सुवर्णमूर्ती आणि सोने लुटून नेले होते.

या घटनेनंतर राज्यभर एकच खळबळ उडाली होती. तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी पोलिसांना दरोडेखोरांचा कसून शोध घेण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे पोलिसांनी तपासाची चके्र फिरवत दरोडेखोरांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी १ किलो ३६१ ग्रॅम सोने हस्तगत केले होते. अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायालयात स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात याची सुनावणी सुरु होती. विशेष मोक्का न्यायाधीश के.आर. पेठकर यांच्या न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत एकूण १०४ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात मंदिर व्यवस्थापन समिती, तपासिक अधिकारी, पंच साक्षीदार, वाहनचालक, वैद्यकीय अधिकारी, सीसीटीव्ही तंत्रज्ञ यांच्या आणि स्थानिकांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

याप्रकरणी ५ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. २ सोनारांना ९ वर्षे आणि ३ महिलांना १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेले फुटेज, दरोडेखोरांनी वापरलेल्या मोबाईल सिमकार्डचे टॉवर लोकेशन यामुळे गुन्ह्याच्या घटनांची मांडणी करण्यात पोलिसांना यश आले. याशिवाय दरोड्यासाठी वापरण्यात आलेल्या पहारी, चोरीला गेलेली दानपेटी, आरोपींकडून सोन्याची लगड हस्तगत करण्यात पोलिसांना आलेले यश महत्वपूर्ण ठरले. या प्रकरणात शासकीय अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी काम पाहिले होते.


हे ही वाचा – ST Workers Strike: गेल्या ५० वर्षांपासून शरद पवारांनी कर्मचाऱ्यांचा घातच केलाय – गोपीचंद पडळकर


 

First Published on: November 18, 2021 8:16 PM
Exit mobile version