दिवाळीतला डाएट प्लान- काय खायचं आणि काय टाळायचं?

दिवाळी म्हटलं की फराळ खाणं आलंच. त्यातही या दिवसात लाडू, करंज्या, शंकरपाळे, चकल्या यासह मिठाईसारखे गोड तुपकट आणि तेलकट पदार्थ आपण सहज खातो. पण नंतर लक्षात येतं की या पदार्थांमुळे कॅलरीज वाढल्या आहेत. गाल गुबगुबीत दिसायला लागलेत. मग पुन्हा वाढलेल वजन कमी करण्यासाठी कसरत करावी लागते. पण हे सगळं टाळता येणं शक्य आहे. त्यासाठी फक्त गरज आहे ती दिवाळीतल्या डाएट प्लानची.

दिवाळीच्या दिवसात शक्यतो बाजारात मिळणाऱ्या मिठाई, बर्फी खाणं टाळावं. कारण बाजारातील पदार्थांमध्ये कृत्रिम रंगच नाही तर कृत्रिम साखरही वापरली जाते. यामुळे बाजारातील मिठाई खाऊ नयेत. घरीच तयार करण्यात आलेले पदार्थ खावेत.

त्यातही साखरेपेक्षा गूळापासून गोडपदार्थ बनवावेत. साखरेपेक्षा गूळ टाकून केलेल गोड पदार्थांमुळे शरीरातील साखर तर वाढत नाहीच उलट तब्येतीसाठीही गूळ आरोग्यवर्धक आहे.

रवा, बेसनाचे लाडू आपण नेहमीच बनवतो. पण जर डाएटबदद्ल तुम्ही जागृक असाल तर यावर्षी नाचणी, ज्वारी किंवा बाजरीचेही लाडू तुम्ही बनवू शकता. हे लाडू आरोग्यासाठी उत्तम तर आहेच शिवाय वेगळी रेसिपी केल्याचा आनंदही मिळतो.

या दिवसात पुरेसे पाणी पिण्याकडेही तेवढेच लक्ष देणे गरजेचे आहे. चहा कमी प्यावा. एक कप चहामुळे ४० कॅलरीज वाढतात.

दिवाळीच्या दिवसात जेवणापेक्षा फराळाचेच पदार्थ जास्त खाल्ले जातात. यामुळे या दिवसात फायबर फूड जास्त खावे. त्यातही पालेभाज्या, कडधान्य, फळ यांचा आहारात आवर्जून समावेश करावा. पोळ्या व भात खाणे जितके टाळता येईल तेवढे टाळावे.

जेव्हा गोड पदार्थ खाण्याची इच्छा अनावर होईल तेव्हा शक्यतो ओट्सचा डोसा, साधा डोसा, किंवा तत्सम पदार्थ खावे. जेणेकरून गोड पदार्थ खाणे आपोआपच टाळता येईल. दिवाळीमध्ये बरेचजण घरात पार्ट्या करतात. पण तुम्हांला माहित आहे का पार्ट्यांमध्ये तुम्ही जे ड्रींक करता त्यामुळेही कॅलरीज वाढते. तर ज्या व्यक्ती ड्रींक्स घेत नाहीत ते आईस्क्रीम, कोकटेल, सॉफ्ट ड्रींक्स घेतात. पण त्यामुळेही कॅलरीज वाढू शकते.

दिवाळीत सुका मेवाही खाल्ला जातो. पण सु्क्यामेव्याचे अतीसेवन केल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो. यामुळे सुका मेवाही प्रमाणात खावा.

 

First Published on: October 26, 2021 7:23 PM
Exit mobile version