Corona Vaccine : कोरोना लसीबाबत बऱ्याच अफवा, त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका! 

Corona Vaccine : कोरोना लसीबाबत बऱ्याच अफवा, त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका! 

आता कोरोनावरील लस उपलब्ध झाली असल्याने कोरोनाबाबत भीती राहिलेली नाही. लसीच्या रूपाने आम्हाला कवच मिळाले असून आमचे कर्मचारी आता आणखीन जोमाने काम करतील, असा विश्वास घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांनी बोलून दाखवला. कोरोनावरील लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत शनिवारी (आज) डॉ. विद्या ठाकूर यांनी सर्वात पहिली लस घेतली. तसेच सध्या कोरोना लसीबाबत बऱ्याच अफवा पसरवण्यात येत आहेत. मात्र, मी स्वतः एक डॉक्टर असून कोरोनाची लस घेतली आहे. आमच्या इतर कर्मचाऱ्यांनाही लस देण्यात आली. आम्हाला लस घेतल्यानंतर काहीही त्रास झालेला नाही. त्यामुळे लसीबाबत ज्या अफवा पसरवण्यात येत आहेत, त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे, असे आवाहनही डॉ. ठाकूर यांनी केले.

मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण होते. त्यावेळी कोरोनावर कोणतेही औषध नव्हते. मात्र, या बिकट परिस्थितीतही मोठ्या प्रमाणात आलेल्या रुग्णांना बरे करण्याचे काम आमच्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, कर्मचारी यांनी केले. आता कोरोनावर लस आल्याने कोरोनाबाबत भीती खूप कमी झाली आहे. आता आमचे कर्मचारी आणखीन जोमाने काम करतील, असे डॉ. विद्या ठाकूर म्हणाल्या.

राजावाडी रुग्णालयात एकूण ५ बूथ असून प्रत्येक बुथवर सकाळच्या सत्रात १०० आणि दुपारनंतरच्या सत्रात १०० अशा एकूण २०० जणांना लस दिली जाणार आहे. ५ बुथवर दिवसभरात एकूण एक हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असल्याचे यावेळी डॉ. ठाकूर यांनी सांगितले.


हेही वाचा – Corona Vaccination: ‘आज आपण एक क्रांतिकारक पाऊल टाकत आहोत’


 

First Published on: January 16, 2021 7:25 PM
Exit mobile version