थ्री स्टार हॉटेलला २५ लाखांचा गंडा ; १२ वर्षाच्या मुलासह भामट्याचे पलायन

थ्री स्टार हॉटेलला २५ लाखांचा गंडा ; १२ वर्षाच्या मुलासह भामट्याचे पलायन

थ्री स्टार हॉटेलला २५ लाखाचा गंडा ; १२ वर्षाच्या मुलासह भामट्याचे पलायन

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अ‍ॅनिमेशन व्हीएफएक्सचे काम करीत असल्याचे भासवून एका भामट्याने खारघरमधील थ्री स्टार हॉटेलच्या दोन डिलक्स रूममध्ये आपल्या १२ वर्षीय मुलासोबत ९ महिने बस्तान मांडून हॉटेल आणि रेस्टॉरंटचे तब्बल २५ लाख १५ हजार रुपयांचे बिल थकवून मुलासह पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुरली मुरुगेश कामत (४३) असे या भामट्याचे नाव असून, खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

कामत हा २३ नोव्हेंबर २०२० रोजी थ्री स्टारमध्ये आपल्या १२ वर्षीय मुलासोबत गेला होता. त्यावेळी त्याने हॉटेलच्या मॅनेजरला आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये अ‍ॅनिमेशन व्हीएफएक्सचे काम करीत असल्याचे आणि त्याचे काम काही दिवसांत सुरू होणार असल्याचे सांगितले. तसेच त्याला ६-७ महिन्यांसाठी दोन रूमची गरज असल्याचे आणि सध्या त्याच्याकडे पैसे नसल्याने रूमच्या भाड्याचे पैसे १ महिन्यानंतर देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने आपले पासपोर्ट जमा करण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे मॅनेजरने त्याची भेट हॉटेल मालक शेट्टी यांच्यासोबत घालून दिल्यानंर त्यांनी देखील पासपोर्ट घेऊन कामत याला हॉटेलमधील रूम देण्यास सांगितले. त्यानंतर या भामट्याला रहाण्यासाठी आणि मीटिंगसाठी दोन सुपर डिलक्स रूम देण्यात आल्या. त्यानंतर कामत याने हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये खाऊन-पिऊन दिवस-रात्र मुलासह मौजमजा सुरू केली.

एक महिन्यानंतर रूमच्या भाड्याची मागणी करण्यात आली असता आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्यानंतर भाडे देण्याचे त्याने आश्वासन दिले. काही दिवसानंतर मॅनेजरने कामत याला संपर्क साधल्यानंतर त्याने खोपोली येथील इमॅजिका विकत घेण्याबाबत त्याचा व्यवहार सुरू असल्याचे आणि सदर व्यवहार झाल्यानंतर हॉटेलचे बील देणार असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती त्याने हॉटेल मालक शेट्टी यांना देखील दिली. त्यामुळे दोन महिने त्याच्याकडे हॉटेलच्या बिलाची मागणी करण्यात आली नाही. मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये कामत याने कोरोनामुळे सिंगापूर येथील डीबीएस बँकेचे व्यवहार बंद असल्यामुळे बँकेमधून पैसे ट्रान्सफर करता येत नसल्याचे कारण सांगत लॉकडाऊन संपल्यानंतर हॉटेलचे बिल देण्याचे आश्वासन दिले.

मे महिन्यात संपर्क साधल्यानंतर त्याने ३ चेक देऊन ते १५ जूननंतर बँकेत टाकण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात कामत याच्याकडे पैसे मागण्यासाठी अनेक व्यक्ती येत असल्याचे लक्षात आल्यानंतर तो हॉटेलची फसवणूक करीत असल्याचा संशय कर्मचार्‍यांना आला. त्यानंतर १७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता कामत याने हॉटेलमधील बाथरूमच्या खिडकीतून मुलासह पलायन केले. हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी कामत राहत असलेल्या रूमचा दरवाजा डुप्लिकेट चावीने उघडल्यानंतर तो मुलासह पळून गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.


हे ही वाचा – रोहा ते वीर दुपदरीकरण पूर्ण ,कोकण रेल्वे आणखी सुसाट


 

First Published on: September 3, 2021 1:13 PM
Exit mobile version