LIVE UPDATES: दीपिका पदुकोण पती रणवीर सिंगसह मुंबईत दाखल

LIVE UPDATES: दीपिका पदुकोण पती रणवीर सिंगसह मुंबईत दाखल

अभिनेत्री दीपिका पदुकोण पती रणवीर सिंग याच्यासह मुंबईत पोहोचली. शनिवारी २६ सप्टेंबरला तिची एनसीबीकडून चौकशी केली जाणार आहे.


मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार १६३ नवे रुग्ण आढळले असून ५४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ९२ हजार ३०१वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ८ हजार ६५५ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत.


गेल्या २४ तासांत राज्यात १९ हजार १६४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४५९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२ लाख ८२ हजार ९६३वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ३४ हजार ३४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची २६ सप्टेंबरला एनसीबीकडून चौकशी होणार आहे. तर उद्या रकुल प्रीत सिंग आणि करिश्मा प्रकाश यांची चौकशी होणार आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत १६१ नवीन कोरोनाबाधित पोलीस आढळले असून १ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या २१ हजार ९८८वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत २३५ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तसेच १८ हजार ३७२ पोलीस रिकव्हर झाले आहे. तर सध्या ३ हजार ३८१ पोलिसांवर उपचार सुरू आहेत.


रिया आणि शौविक चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जावरील याचिकेवर २९ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.


एनडीपीएस प्रकरणी रिया आणि शौविक चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.


अभिनेत्री सारा अली खान मुंबई विमानतळावर दाखल झाली आहे. सारा अली खानची ड्रग्ज प्रकरणी २६ सप्टेंबरला एनसीबी चौकशी करणार आहे. त्यामुळे सध्या तिच्या जुहूच्या निवासास्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे.


उद्याच्या धनगर ST आरक्षणाला भाजप खासदार डॉ. विकास महात्मे यांचा पाठिंबा असणार आहे.  उद्या ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ‘ढोल वाजवा’ आंदोलनात ते सहभागी होणार आहेत.


ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डिन जोन्सचे मुंबईत निधन झाल्याचे समोर येत आहे. ते ५९ वर्षांचे होते. माहितीनुसार हार्ट अटॅक आल्यामुळे त्याचे निधन झाले आहे.


मुंबई: विशेष एनडीपीएस कोर्टाने नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोला (एनसीबी) तळोजा तुरुंगात भेट देण्यास परवानगी दिली आहे. तसेच रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतसिंह राजपूतचा कूक दिपेश सावंत यांचे पुढील जबाब नोंदवण्याची परवानगी दिली आहे.


मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग

मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. मंत्री शिंदे म्हणाले, काल मी माझी कोव्हीड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…


भिवंडीतील इमारत दुर्घटनेचे बचावकार्य थांबवले

भिवंडीतील पटेल कम्पाऊंड इमारत दुर्घटनेत आज, गुरूवार सकाळपर्यंत ४१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर कालपर्यंत २५ जणांची ढिगाऱ्याखालून सुखरुप सुटका करण्यात आली होती. मात्र आता हे इमारत दुर्घटनेचे बचावकार्य सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी थांबवण्यात आले आहे.


मुंबई डबेवाले असोसिएशनने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर भेट घेतली. या भेटीदरम्यान डबेवाल्यांनी मुंबईतील लोकल रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी मिळावी, अशी प्रमुख मागणी केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर तसेच इतर सदस्य उपस्थित होते.


आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूची लागण झालेल्या ८६ हजार ५०८ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर या काळात १ हजार १२९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत ९१ हजार १४९ जणांचा बळी कोरोनाने घेतल्याचे समोर आले आहे.(सविस्तर वाचा)


लोकल सेवा सुरळीत

काल दिवसभर मुसळधार पावसाने मुंबईकरांना चांगलंच झोडपून काढले होते. यामुळे सर्वत्र ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. यासह लोकल ट्रॅकदेखील पाण्याखाली गेले होते. यामुळेच मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल सेवा ठप्प झाली होती. मात्र आज ती पुन्हा रूळावर आली असून  मुंबईतील अत्यावश्यक सेवेसाठी सुरु असलेली लोकल सेवा सुरळीत झाली असल्याची माहिती मिळतेय.


देशात कोरोनाचा कहर सुरूच असून दिवसेंदिवस कोरोना चाचण्यांचे प्रमाण देखील वाढल्याचे दिसत आहे. काल दिवसभरात ११ लाख ५६ हजारांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. तर देशात आतापर्यंत ६ कोटी ७४ लाख ३६ हजार ३१ इतक्या कोरोना चाचण्या घेतल्याची माहिती ICMR ने दिली आहे.


देशात कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे आज या पार्श्वभूमीवर देशातील सात राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यामध्ये महाराष्ट्र देखील होते. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. पण गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या महाराष्ट्रात नव्या रुग्णसंख्येचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. तसेच राज्यातील रिकव्हरी रेट वाढत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २१ हजार २९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४७९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. (सविस्तर वाचा)


भिवंडी इमारत दुर्घटनेत मृत्यूच्या संख्येत वाढ

भिवंडीतील पटेल कम्पाऊंड इमारत दुर्घटनेत आज, गुरूवार सकाळपर्यंत ४१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर कालपर्यंत २५ जणांची ढिगाऱ्याखालून सुखरुप सुटका करण्यात आली होती. (सविस्तर वाचा)

First Published on: September 24, 2020 10:50 PM
Exit mobile version