Jaya Ekadashi: माघी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांनी सजवलं; वाचा या एकादशीबद्दल

Jaya Ekadashi: माघी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांनी सजवलं; वाचा या एकादशीबद्दल

सौजन्य - विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती

माघ शुद्ध जया एकादशीनिमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल, रुक्मिणीच्या मंदिराला फुलांची आकर्षक सजावट केली आहे. विठ्ठल, रुक्मिणी मातेचा गाभारा विविध फुलांनी सजवला आहे. त्यामुळे आज विठुराय आणि रुक्मिणी मातेच गोजिरं रुप अधिकचं खुलून दिसतंय. आज जया एकादशीनिमित्ताने विठ्ठल, रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. वारकऱ्यांच्या मते आजच्या माघ शुद्ध दशमीलाही अनन्यसाधारण महत्व आहे. माघी यात्रेसाठी तीन लाखांपेक्षा जास्त वारकरी पंढरपुरात पोहोचले असून चंद्रभागेच्या पात्रामध्ये नवीन पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात आले आहे. तसेच यात्रेच्या निमित्ताने शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त दाखल करण्यात आला आहे.

सौजन्य – विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती

जया एकादशी कधी सुरू होते?

जया एकादशी २०२२ मध्ये ११ फेब्रुवारी दुपारी १ वाजून ५४ मिनिटांनी सुरू झाली आहे, जी १२ फेब्रुवारी दुपारी ४ वाजून २६ मिनिटांपर्यंत असणार आहे. या काळात जया एकादशीचे व्रत ठेवण्यात येते. या दिवसाचा शुभ मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिटांपासून ते १२ वाजून ५७ मिनिटांपर्यंत असेल.

जया एकादशी दिवशी भगवान विष्णुंची पुजा केली जाते आणि जया एकादशी व्रताची कथा ऐकली जाते. ही व्रतकथा ऐकल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळते आणि या व्रताचे महत्त्व कळते. तसेच मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो, असे म्हटले जाते.

काय आहे जया एकादशी व्रताची कथा?

एकदा धर्मराजा युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्णाला माघ शुक्ल एकादशी व्रताचे महत्त्व सांगण्यास सांगितले. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना जया एकादशीच्या व्रताची कथा ऐकवली.

एकेकाळी नंदन वनात एक उत्सव होत होता. यामध्ये देवी-देवता आणि संत वगैरे उपस्थित होते. उत्सवात संगीत आणि नृत्यूही होते. गंधर्व मल्यवान आणि पुष्यवतीही नृत्य करत होते. दोघे एकमेकांवर भाळले आणि सर्वांसमोर ते असे काही नृत्यू करू लागले की, ते आपल्या मर्यादा विसरून गेले. त्यांच्या अशा वागण्यामुळे इंद्रदेव संतप्त झाले. त्यानंतर इंद्रदेवाने दोघांनाही स्वर्गलोकातून हकलून देऊन मृत्यूलोक म्हणजे पृथ्वीवर राहण्याचा शाप दिला. शापामुळे पुष्यवती आणि मल्यवान यांना पिशाच योनीत जीवन मिळाले. त्या दोघांनी हिमालयातील एका झाडावर आश्रय घेतला. त्यांचे जीवन खूप कष्टमय होते. त्याच वर्षी माघ शुक्ल एकादशीला दोघांनी भोजन केले नाही, त्यांनी फळे खाल्ली. सर्दीमुळे त्यांना झोप नव्हती, त्यामुळे त्या रात्री त्यांनी जागरण केले. पण कडाक्याच्या थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाला.

पुष्यवती आणि मल्यवान यांनी नकळत जया एकादशीचे व्रत केले होते. भगवान विष्णुंची दृष्टी त्या दोघांवर पडली आणि त्या दोघांना प्रेत योनीतून मुक्त केले. जया एकादशी व्रतामुळे दोघे पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झाले आणि पुन्हा स्वर्गात पोहोचले. इंद्रदेव पुष्यवती आणि मल्यवान यांना पाहून आश्चर्यचकीत झाले. तेव्हा दोघांनी देवराज इंद्राला जया एकादशीच्या व्रताचे महत्त्व आणि भगवान विष्णूंचा महिला सांगितले. हे ऐकून इंद्रदेव आनंदी झाले आणि त्यांनी दोघांनाही पुन्हा स्वर्गलोकात राहण्याची परवानगी दिली. त्यामुळे असे म्हटले जाते की, जो जया एकादशीचे व्रत करतो, त्याच्या दुःखांचा नाश होतो.


हेही वाचा – राशीभविष्य: शनिवार, १२ फेब्रुवारी २०२२


 

First Published on: February 12, 2022 8:56 AM
Exit mobile version