रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाविरोधात मानवी साखळी आंदोलन

रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाविरोधात मानवी साखळी आंदोलन

रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाविरोधात मानवी साखळी आंदोलन

मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकर व्हावे त्याचबरोबर सर्व सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी पुकारलेल्या साखळी आंदोलनाला पोलादपुरमध्ये प्रारंभ झाला. या आंदोलनामध्ये हजारो कोकणवासीय सहभागी झाले. हातात काळे झेंडे, खांद्याला काळ्या फित लाऊन शासनाचा निषेध या ठिकाणी करण्यात येत असून, शासनाने लवकरात रस्त्याचे काम पुर्ण कराव अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जात आहे. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा रखडलेला प्रकल्प हा केंद्र सरकारला नामुष्की आणणारा ठरला आहे. कित्येक वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर मुंबई गोवा महामार्ग क्रमांक ६६ (पूर्वीचे एनएच ७). या महामार्गाच्या कामाचे घोडं अखेर गंगेत न्हालं आणि इंदापूर ते चिपळूण या ९० किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाची कामे ठेकदारांमार्फत सुरू झाली. याशिवाय जणू काही केंद्र सरकारने आंदणच दिल्याच्या थाटात पूर्ण अंतरात ठेकेदार कंपनीने केलेल्या कामांमुळे केंद्र सरकारची उरलीसुरली अब्रूच थेट वेशीवर टांगली आहे. केलेल्या कामामुळे प्रवासात अडथळ्याची शर्यत पार करताना वाहनचालक व प्रवाश्यांना सळो कि पळो करून सोडले आहे. स्वाभाविक हैरान परेशान झालेल्या जनतेने आता महामार्गाच्या कामाविरोधात लढ्याचे दंड थोपटले आहे. आज ५ सप्टेंबरला मानवी साखळीचे आंदोलन छेडले आहे. हे आंदोलन पोलादपूरमधून सुरू झाले.

महामार्गाच्या पळस्पे फाटा ते इंदापूर पहिला व इंदापूर ते चिपळूण पर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला अठरा वर्षे उलटूनही कामे अर्धवट आहेत. तुकडया तुकड्यात केलेले काम , त्यामुळे फाटा बदलणाऱ्या रेल्वे प्रमाणे कधी डावी तर कधी उजव्या बाजूने करावा लागणारा प्रवास, जागोजागी आकाशातील लहान मोठ्या तारेतारकांप्रमाणे महामार्गावरील पडलेले खड्डे , रस्ता क्रॉसींग व्यवस्था, गाव आणि शहराच्या ठिकाणी सर्विस रस्ता, फूटपाथ, महामार्गाला जोडणारे अंतर्गत गाव रस्ते यासह कित्येक कामांमध्ये नियोजन शुन्यता आहे. त्यामुळे महामार्गाच्या कामाच्या विरूद्ध समृद्ध कोकण संस्था आणि २५ सामाजिक संस्था एकवटल्या आहेत. कोकण हायवे समितीच्या नावाखाली कोकणवासीयांचा सोबत लढ्याचे शिंग फुकले आहे.

या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी रायगड पालकमंत्री अदिती तटकरे , स्थानिक आमदार भरत गोगावले , महाड नगराध्यक्षा स्नेहल जगताप समितीचे मुख्य समन्वयक अध्यक्ष संजय यादवराव राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुख ठणकर, किशोरधारीया, अँड शशिकांत पवार अँड ओवेस पेचकर हे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पारले लोहारे पोलादपूर सडवली काटे तळी धामणदेवी , कोंढवी , कातळी बंगला भोगाव खुर्द , भोगाव बू सहपंचक्रोशीतील नागरीक आणी महाविद्यालयीन तरूण तरूणींनी सहभाग घेतला आहे.

 

 -बबन शेलार


हेही वाचा – आंदोलन कोरोनाच्या विरोधात करा, मुख्यमंत्र्यांची राजकारण्यांना विनंती


 

First Published on: September 5, 2021 1:51 PM
Exit mobile version