मुरूड : बोर्ली महावितरणचा अजब कारभार, मंजुरीपूर्वीच एल.टी.जोडणी

मुरूड : बोर्ली महावितरणचा अजब कारभार, मंजुरीपूर्वीच एल.टी.जोडणी

मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता मनोज चव्हाण यांनी मंजुरी आधीच एल. टी. जोडणीचे (लाईन)पूर्ण केल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश थळे यांनी जिल्ह्याच्या पेणस्थित अधीक्षक अभियंत्यांकडे लेखी स्वरुपात केली आहे. थळे यांनी याबाबत मुरुड येथील उप कार्यकारी अभियंता येरेकर, तसेच रोहे कार्यकारी अभियंत्यांकडे ८ मार्च २०२१ रोजी प्रत्यक्ष काम झाल्याच्या छायाचित्रासहित तक्रार केली होती. तसेच येरेकर यांना पुन्हा ५ एप्रिल रोजी स्मरणपत्र दिले. मात्र ते कोणत्याही प्रकारची माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेतली असता, बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील सुरई येथील साईनाथ पाटील यांची बदली लाईन मंजूर करण्यापूर्वीच काम केले असून, मूळ प्रस्ताव जुने खांब बदलले असल्याचा आहे. त्याचप्रमाणे भोईघर येथील पुष्पा बिरवाडकर यांच्या लाईनचेही काम मंजूर नसतानासुद्धा आधीच काम करून घेतले आहे.

शासकीय कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून फसवणूक करणे भारतीय दंड संहिता १८६० फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १९७ व १९८ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच याबाबत कार्यलयाकडून सखोल चौकशी होऊन चव्हाण यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी थळे यांनी केली आहे. त्यांना पाठीशी घालणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. याबाबतच्या निवेदन प्रती थळे यांनी मुख्य अभियंता, तसेच वाणिज्य विभागाचे मुख्य अभियंता यांना सुद्धा पाठविले आहे.


हे ही वाचा – नाशिकसह चार जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका लांबणीवर; सहकार विभागाकडून शासन आदेश जारी


 

First Published on: August 27, 2021 7:51 PM
Exit mobile version