तेलाच्या तवंगामुळे मुरुड समुद्रकिनारा धोक्यात

तेलाच्या तवंगामुळे मुरुड समुद्रकिनारा धोक्यात

मुरुडचा समुद्र किनारा ऑईलमुळे झाला विद्रुप

मुरुड समुद्र किनारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ऑईल वाहून आले असून, किनारा मोठ्या प्रमाणात विद्रुप झाला आहे. शहराला अडीच किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असून, पूर्वीपेक्षा यावेळी ऑइल येण्याचे प्रमाण दुपटीने वाढल्याने दगडाच्या संरक्षक भिंतजवळ फक्त ऑईलच दिसून येत आहे. खोल समुद्रातून वाहून आलेले ऑईल वाळूत मिसळल्यामुळे त्याचे गोळे तयार झाले आहेत. ते किनार्‍यावर पसरल्याने एकूणच तेथे बकाल स्वरुप आले आहे. समुद्रात ऑईल आल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. समुद्र किनारी येणार्‍या ऑईलचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी मच्छीमारांनी शासनाकडे केली आहे. मुंबईतील खोल समुद्रात ऑईल कंपन्यांच्या तेल विहिरी आहेत. तेथून गळती झाल्यास असे ऑईलचे तवंग समुद्र किनारी येत असतात. तेल कंपन्यांकडून मच्छीमारांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मुरुड समुद्र किनारी डांबर सदृश्य चिकट आणि जाडसर ऑईल मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली आहे. खोल समुद्रातील मासेमारी सध्या बंद असली तरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी समुद्र किनारी जाळी टाकून (पेर्‍याने) मासेमारी केली जाते.

परंतु वाहून आलेल्या खराब ऑईलमुळे समुद्रातील पाणी दूषित होते आणि मासे दूर खोल समुद्रात जातात. परिणामी किनार्‍यावरील मासेमारीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. सध्या पावसाळी हंगाम सुरू असून, खोल समुद्रात मासेमारी ३१ जुलैनंतर सुरू करण्यात अली आहे. पावसाळ्याच्या या बिकट दिवसांत खाडी लगत मासेमारी करण्यात येते. अशावेळी समुद्र किनारी आलेले ऑईल हे खूप अडचणीचे ठरत आहे. स्थानिक मच्छीमारांसोबत याचा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटक समुद्रात जाण्यास उत्सुक नाहीत. दुरून डोंगर साजरे याप्रमाणे ते लांबूनच समुद्र किनारा पहाताना दिसत आहेत.


हे ही वाचा – Ganshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत


 

First Published on: September 16, 2021 9:33 PM
Exit mobile version