मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा चालवलाय

मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा चालवलाय

देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय थिल्लरपणा चालवलाय, अशी टीका करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी तोफ डागली. मुख्यमंत्री हे अतिशय संवेदनशील परिस्थितीत थिल्लरपणा करत आहेत. इतक्या दिवसांनंतर आज दोन-तीन तासांसाठी ते घराबाहेर आले आणि स्वत:ची तुलना मोदी साहेबांशी करत आहेत, असा जोरदार आक्षेपही देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

राज्यात परतीच्या पावसाने हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांची उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. काही महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांना हेक्टरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्या, अशी मागणी करणारे सत्ताधारी पक्षात आहेत. तर सत्ताधारी पक्षातील आज विरोधात बसले आहेत. मात्र, आज दोघेही बांधावर असून त्यावरून या दोघांमध्ये राजकारण रंगले असताना शेतकरी वार्‍यावर तर इतर जनता त्यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फड पाहण्यात गुंग झाली आहे.

अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी फडणवीस सोमवारी माढा आणि करमाळा दौर्‍यावर आले होते. तिथे नुकसानीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. सरकार चालवायला दम लागतो. केंद्राने कोणतेही पैसे थकवले नसून राज्याचा जीएसटी कमी जमा झाल्याने त्याची भरपाई केंद्र सरकार करून देत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

केंद्र सरकारने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे. आता लोकांना तातडीने मदतीची गरज आहे. अशावेळी केंद्राकडे मदतीसाठी बोट दाखवण्याऐवजी हिम्मत असेल तर राज्य सरकारने शेतकर्‍यांना मदत करावी, असे आव्हान फडणवीस यांनी दिले.

केंद्र सरकारने कर्ज काढून राज्याच्या जीएसटीचे पैसे दिले आहेत असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला. मला अर्थशास्त्र चांगले कळते असे सांगताना राज्याने ५० हजार कोटी कर्ज घेतले आहे. आणखी ७० हजार कोटी रुपये कर्ज काढण्याची राज्याकडे क्षमता आहे, असे फडणवीस म्हणाले. कर्ज काढा, पण शेतकर्‍यांना मदत करा. आम्ही शेतकर्‍यांना केंद्राच्या मदतीची वाट न बघता १० हजार कोटी रुपये मदत केली होती, अशी आठवणही फडणवीस यांनी अजित पवार यांना करून दिली.

First Published on: October 20, 2020 6:17 AM
Exit mobile version