मोरा-मुंबई जलप्रवासाला दरवाढीचं ग्रहण; डिझेल दरवाढीमुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

मोरा-मुंबई जलप्रवासाला दरवाढीचं ग्रहण; डिझेल दरवाढीमुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

मोरा-मुंबई जलप्रवासाला दरवाढीचं ग्रहण; डिझेल दरवाढीमुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

उरणच्या मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान असलेल्या जलवाहतुकीचे तिकटदर वाढले आहेत. पावसाळ्यात वाढलेले हे दर डिझेल दरवाढीमुळे कायम ठेवण्यात आले आहेत. पावसाळ्यासाठी ७० रुपयांवरून ९० रुपये तिकीट दरवाढ करण्यात आलेली होती. दरवाढ जून ते ऑगस्ट या कालावधीपुरती मर्यादित ठेवून ती १ सप्टेंबरपासून कमी केली जाते. मात्र यावर्षी हे वाढलेले दर कायम राहणार असल्याची माहिती बंदर विभागाने दिली आहे. पावसाळ्यासाठी करण्यात आलेली दरवाढ १ सप्टेंबरपासून कमी होण्याऐवजी डिझेल दरवाढीमुळे कायम ठेवण्यात येणार आहे. २०१६ मध्ये ४८ रुपयांवर असणारे दर आता २०२१ मध्ये ९० रुपयांपर्यंत येऊन पोहचले आहेत. त्यामुळे प्रवाशांना याचा नाहक त्रास होत आहे.

महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या देखरेखीखाली मोरा ते मुंबई दरम्यानची जलसेवा सुरू आहे.पावसाळी हंगामातील दरवाढ कायम ठेवण्याची मागणी जलवाहतूकदारांनी केल्याने १ सप्टेंबर पासून ही दरवाढ कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या मोरा बंदर विभागाचे अधिकारी प्रभाकर पवार यांनी दिली.

मुंबईच्या पूर्व किनारपट्टीपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेला उरण हा मुंबईनजीकचा सर्वात जवळचा तालुका आहे. याच उरण तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या मोरा बंदर ते भाऊचा धक्क्याचा फायदा मुंबईला जाणाऱ्या चाकरमानी, शालेय विद्यार्थी आणि व्यावसायिकांना अधिक होतो. उरण तालुक्यातील करंजा आणि मोरा येथील बहुतांश मच्छिमार आणि कोळी बांधव हेदेखील मोठ्या प्रमाणावर मुंबईला मासळी खरेदी-विक्री करण्यासाठी दररोज ये-जा करीत असतात. मोरा-मुंबई या जलमार्गावरून दररोज बहुतांश प्रवासी प्रवास करतात. मात्र कोरोनाच्या सावटामुळे प्रवाशांची संख्या तुलनेने कमी प्रमाणात आहे.

प्रवाशांच्या खिशाला दरवाढीचा फटका कायम

कोरोनामुळे अनेक लोकांनी रोजगारच्या संधी गमावल्या आहेत.याशिवाय अनेक गोष्टींवर होणाऱ्या दरवाढीमुळे महागाईचे प्रमाण वाढले आहे. त्यातच दररोज होणाऱ्या डिझेल दरवाढीचा फटका हा नेहमी उरण ते मुंबई असा जलप्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. रस्ते मार्गापेक्षा जलमार्गाचा प्रवास हा सोयीस्कर याशिवाय सामान्यांच्या खिशाला परवडणारा असतो मात्र सध्या दरवर्षी या प्रवासातील दरात वाढ होऊ लागल्याने या मार्गाने कितपत प्रवास करायचा, असा प्रश्न नियमित प्रवास करणाऱ्यांना पडला आहे.


हे ही वाचा – धक्कादायक! १८ महिन्यांच्या चिमुकल्याला मातेनेच केली अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल, महिलेला अटक


 

First Published on: September 1, 2021 5:13 PM
Exit mobile version