राज ठाकरे उद्या नवी मुंबईत, भडकाऊ भाषण प्रकरणी वाशी न्यायालयात हजेरी!

राज ठाकरे उद्या नवी मुंबईत, भडकाऊ भाषण प्रकरणी वाशी न्यायालयात हजेरी!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी नवी मुंबईत येणार आहेत. वाशी न्यायालयानं जारी केलेल्या वॉरंटनंतर राज ठाकरे ६ फेब्रुवारी रोजी शनिवारी सकाळी ११ वाजता वाशी न्यायालयात हजेरी लावणार आहेत. नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरे नवी मुंबईत येत असल्यामुळे स्थानिक मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्याचं नियोजन मनसे कार्यकर्त्यांनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची वाशी न्यायालयातील सुनावणी ही मनसेसाठी राजकीय फायद्याची ठरतेय का? याविषयी राजकीय जाणकारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलंय. त्यामुळे राज ठाकरे उद्या शनिवारी वाशी न्यायालयात हजर राहणार आहेत. २६ जानेवारी २०१४ रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकाऊ भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची वाशी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, या प्रकरणी अनेक वेळा न्यायालयात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे आता बेलापूर न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे उद्या सकाळी 11 वाजता राज ठाकरे नवी मुंबईत दाखल होणार आहेत.

राज ठाकरे येणार म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचं ग्रँड वेलकम करण्याचे ठरवलंय. नवी मुंबई पालिका निवडणूकीच्या तोंडावर राज ठाकरे येत असल्याने याचा राजकीय फायदा नक्कीच मनसेला होईल अशी आशा मनसैनिकांना वाटतेय.

First Published on: February 5, 2021 6:54 PM
Exit mobile version