School Reopen : ठाण्यात पहिली ते सातवीचे वर्ग १५ डिसेंबरपासून सुरु

School Reopen : ठाण्यात पहिली ते सातवीचे वर्ग १५ डिसेंबरपासून सुरु

शासनाने निर्गमित केलेल्या कोविड१९च्या नियंत्रण नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेचे पहिली ते चौथीचे वर्ग आणि नगरपंचायत, नगर परिषदेचे पहिले ते सातवीचे वर्ग १५ डिसेंबर २०२१ पासून सुरु होणार आहेत. हे वर्ग जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मान्यतेने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी दिली.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २९ नोव्हेंबर २०२१ रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे ग्रामीण भागातील पहिले ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करताना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करून जिल्हा परिषदेचे पहिली ते चौथीच्या ९८७ शाळा मंगळवारपासून सुरु होणार आहेत. यापूर्वी ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाले आहेत.

कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्यावर टप्याटप्याने शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेची खबरदारी घेऊनच शाळा सुरू करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुसारच वर्ग सुरु करताना शाळेची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे, शिक्षकांची कोविड चाचणी आणि लसीकरण करणे, विद्यार्थी बैठक व्यवस्था करताना दोन विद्यार्थांमध्ये किमान ६ फुट अंतर ठेवणे, गर्दी जमेल असा शालेय कार्यक्रम न करणे आदी सूचनांचे पालन करण्याचे निर्देश  बडे यांनी सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत.

ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून व्यापक स्वरुपात लसीकरण मोहिम देखील सुरु आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण होण्यासाठी आरोग्य विभागाने लसीकरणसत्राचेही आयोजन केले होते. त्यामुळे विद्यार्थांची सर्व खबरदारी घेऊनच शाळा सुरु होणार असल्याचे  बडे यांनी सांगितले.

 विशेष काळजी घेण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन

राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनेनुसार कोविड- १९ व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणूच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेत शहरातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग १५ डिसेंबर २०२१ पासून सुरू करण्यात येत आहेत. दरम्यान कोव्हिड १९ तसेच ओमिक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी शिक्षक, पालक तसेच विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

ठाण्यात शाळा सुरू करणेबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ.‍विपिन शर्मा यांनी यापूर्वीच बैठक घेवून शाळा सुरू करणेबाबच्या बाबीचा सविस्तर आढावा घेतला आहे. त्यानुसार ठाण्यातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्याअनुषंगाने कोव्हिड १९ तसेच ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेवतीने मुलांच्या आरोग्याची काळजी घेत ठाण्यातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आजपासून १५ डिसेंबरपासून सुरू करण्यात येत आहेत. तरी संसर्ग टाळण्यासाठी शहरातील सर्व शिक्षक, पालक तसेच विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


हे ही वाचा – लहान मुलांसाठी लसीचा प्लॅन तयार, सरकारी आदेशाची प्रतिक्षा – अदार पूनावाला


 

First Published on: December 14, 2021 8:02 PM
Exit mobile version