महाड औद्योगिक क्षेत्रातील ‘हायकल’ मधील कामगार आक्रोश आंदोलनाच्या तयारीत

महाड औद्योगिक क्षेत्रातील ‘हायकल’ मधील कामगार आक्रोश आंदोलनाच्या तयारीत

महाड औद्योगिक क्षेत्रातील हायकल लिमिटेड या उद्योगातील कामगारांनी आक्रोश आंदोलन पुकारले आहे. कामगार नेते भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगार महासंघाने हे आंदोलन पुकारले असून, हायकल व्यवस्थापनाकडे बोनसच्या करण्यात आलेल्या मागणीवर हायकलने कोणताही प्रतिसाद न देता हटवाद जोपसणार्‍या व्यवस्थापनाचा कामगारांनी निषेध केला आहे. कोविड-१९ च्या महामारीच्या काळात कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कंपनीच्या उत्पादनात खंड पडू दिला नाही. कंपनीला करोडो रूपयांचा फायदा झाला. महाड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येऊन महाड परिसरातील अनेक कारखाने बाधीत झाले. हायकेल लि. मध्ये काम करणार्‍या कामगार-कर्मचार्‍यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले, वित्तहानी झाली, काही कारखान्यांनी त्यांच्या कामगारांना मदत केली. पण हायकल लि. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना वार्‍यावर सोडल्यामुळे काहीच मदत होऊ शकली नाही.

प्लॅन्टमध्ये होणार्‍या प्रदुषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कामगारांच्या मानसिक, शारिरीक छळाबरोबरच कामगारांच्या आरोग्याची सुद्धा हेळसांड होत आहे. व्यवस्थापनाच्या ठराविक वरीष्ठ अधिकार्‍यांची कामगारांच्या बाबतीत नकारात्मक वागणूक असल्यामुळे आणि कंपनी व्यवस्थापनाला कामगारांचे प्रश्न सोडविण्याची अजिबात इच्छा नसल्याची भावना कामगारांमध्ये निर्माण झाली आहे व त्यामुळे अस्थैर्य-अस्थिरतेचे वातावरण तयार झालेले आहे. त्यातच कंपनीला फायदा होऊनही बोनस संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा नसल्यामुळे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. २२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत कंपनीकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर कामगार आक्रोश आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे बोनस संदर्भात योग्य तो मार्ग निघायला पाहिजे. नाही तर उद्भवणार्‍या परिस्थितीला व्यवस्थापन जबाबदारी राहील, असा इशारा कामगारांनी दिला आहे.


हे ही वाचा – Maharshtra Unlock: राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री १२ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी


 

First Published on: October 19, 2021 6:01 PM
Exit mobile version