केंद्रातील आणि राज्यातील सरकार शेतकरीविरोधी; नाना पटोलेंची आक्रमक भूमिका

केंद्रातील आणि राज्यातील सरकार शेतकरीविरोधी; नाना पटोलेंची आक्रमक भूमिका

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून आज (ता. ०९ मार्च) सभात्याग करण्यात आला. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारविरोधात परखड शब्दात टीका करत आक्रमक भूमिका मांडली. विधानसभा अध्यक्ष हे सरकारच्या बोलण्यावरून विरोधकांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप नाना पटोले यांच्याकडून करण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन देखील नाना पटोले यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

शेतकऱ्यांचा मालाला मिळणारा कमी भाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुद्द्यांवरून विरोधकांनी विधानसभा सभागृहात सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करू न दिल्याने विरोधकांकडून सभात्याग करण्यात आला. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विधानसभा नियमाच्या प्रमाणे ५७ चे नोटीस देऊन सगळे कामकाज बाजूला ठेऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने चर्चा करावी, अशी विनंती विधानसभा अध्यक्षांना करण्यात आली. पण विधानसभा अध्यक्षांनी सरकारच्या इशाऱ्यावर विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप नाना पटोले यांच्याकडून करण्यात आला आहे.

तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे कांदा आणि तूर खरेदी सुरु करण्यात आली आहे, पण असे काहीही झालेले नाही. तर १६ हजार कोटींची शेतकऱ्यांना मदत देखील देण्यात आलेली नाही, त्यामुळे हे सरकार रेटून खोटे बोलत असल्याचे पटोले यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले. पुढे ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपचे ईडीचे सरकार करत आहे. राज्यातील आणि केंद्रातील सरकार हे शेतकरीविरोधी सरकार आहे. पण या शेतकरीविरोधी सरकारकडून शेतकऱ्यांसाठीची मदत घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका यावेळी नाना पटोले यांनी स्पष्ट केली आहे.

हेही वाचा – शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

आत्महत्या करत असलेले शेतकरी हे तरुण शेतकरी आहेत. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो की, त्यांनी आत्महत्या करू नय. केंद्र आणि राज्यसरकार दळभद्री आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे कृषिमंत्री असले तरी त्यांच्या मतदारसंघातील शेतकरी हे आत्महत्या करत आहेत. त्यामुळे त्यांनी तर आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. फक्त कागदावर घोषणा केल्यानंतर या सरकारने अद्यापपर्यंत अतिवृष्टीची मदत सुद्धा शेतकऱ्यांना केलेली नाही, अशी माहिती देत नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे.

First Published on: March 9, 2023 12:28 PM
Exit mobile version