प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी ‘महिला विकास व्यासपीठ’ असण्याची उपसभापती नीलम गोऱ्हेंची मागणी

प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी ‘महिला विकास व्यासपीठ’ असण्याची उपसभापती नीलम गोऱ्हेंची मागणी

Neelam Gorhe took note of the offensive video in Bhandara district PPK

मुंबई : राज्याचे चौथे महिला धोरण प्रभावी होण्यासाठी विधानभवन येथे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधानपरिषद सदस्या प्रज्ञा सातव, डॉ. मनीषा कायंदे, उमा खापरे आणि विधानसभेच्या महिला सदस्या यामिनी जाधव, ऋतुजा लटके, लताबाई सोनवणे, मनीषा चौधरी, विद्या ठाकूर, देवयानी फरांदे, मेघना सकोरे – बोर्डीकर, श्वेता महाले, माधुरी मिसळ, नमिता मुंदडा, मंदा म्हात्रे, मोनिका राजळे, भरती लव्हेकर, सीमा हिरे, सरोज अहिरे, आदिती तटकरे, सुमन पाटील, सुलभा खोडके, जयश्री जाधव, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, प्रतिभा धानोरकर, प्रणिती शिंदे, मंजुळा गावित आणि गीता जैन यांसह महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन उपस्थित होते.

या बैठकीमध्ये उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, चौथे महिला धोरण अस्तित्वात आल्यानंतर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘महिला विकास मंच’ असावे. यामध्ये त्या जिल्ह्यातील महिला खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्षा, पंचायत समिती अध्यक्षा, सरपंच, नगराध्यक्षा अशा जवळपास शंभर महिला सदस्य आणि त्या भागातील महिला संस्थांच्या प्रमुख ५० महिला प्रतिनिधींचा यामध्ये समावेश असावा. महिला विकास मंचाअंतर्गत त्यांची आणि पालकमंत्री यांची प्रत्येक महिन्याला बैठक व्हावी. यामधील सदस्यांनी महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी तसेच वाढीव निधी मिळण्यासाठी प्रयत्न करावा.

महिला व बालविकास विभागाबरोबर विभागीय आयुक्त, विभागीय स्तरावरील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक व्हावी. यामध्ये महिला विकास मंचच्या बैठकीतील मागणीबाबत काय अंमलबाजवणी होत आहे? याचा दर तीन महिन्यांनी अहवाल सादर केला जावा. जेणेकरून महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मदत होईल, असेही यावेळी उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडून या बैठकीमध्ये सांगण्यात आले.

हेही वाचा – आम्ही सातत्याने भूमिका मांडतोय पण सरकारकडून थातुरमातुर उत्तर मिळतायेत -अंबादास दानवे

तसेच महिला व बालविकास विभागाला तीनशे कोटी रुपयांची तरतूद वाढवून दिली जावी. जेणेकरून कोविडमुळे, शेतकरी आत्महत्येमुळे ज्या महिला विधवा झाल्या आहेत, शहरी भागात ज्या महिला एकट्या आहेत, त्यांना निर्वाह भत्ता म्हणून दर महिन्याला ठराविक रक्कम देता येईल, अशी अपेक्षा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी लक्ष घातल्याने महिला धोरण पूर्ण करण्यात यश आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून या बैठकीमध्ये देण्यात आली आहे.

First Published on: March 14, 2023 7:48 PM
Exit mobile version