विधान परिषदेतील ‘ती’ अनोळखी व्यक्ती कोण? आमदारांची उपसभापतींकडे तक्रार

विधान परिषदेतील ‘ती’ अनोळखी व्यक्ती कोण? आमदारांची उपसभापतींकडे तक्रार

आमदारांवर अज्ञातांकडून करण्यात येणारे हल्ले यांमुळे राज्य सरकारवर विरोधकांकडून आधीच ताशेरे ओढण्यात येत आहेत, अशातच आता विधिमंडळातील आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सादर करण्यात आला. पण या अधिवेशनात आमदार आणि राजकीय नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्यांवरून आधीच प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. असे असताना आता पुन्हा एकदा आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विधानपरिषदेत एक अज्ञात व्यक्ती येऊन बसल्याची तक्रार विधान परिषदेच्या आमदारांकडून करण्यात आली. आमदारांनी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना यासंदर्भातील तक्रार केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी विधान परिषदेत अधिवेशन सुरु असताना एक अज्ञात व्यक्ती सभागृहात येऊन बसल्याचे सांगण्यात येत आहे. उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे आमदारांनी केलेल्या लेखी तक्रारीत म्हंटले आहे की, एक अज्ञात व्यक्ती विधान परिषदेमध्ये आमदार ज्या ठिकाणी बसतात, त्या ठिकाणी येऊन बसला होता. या तक्रारीनंतर आता सभागृहाच्या आतील आमदारांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर विधिमंडळ कार्यालयाकडून उत्तर देण्यात आले आहे. विधिमंडळाकडून सभागृहात अशी कोणतीही अज्ञात व्यक्ती आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. विधिमंडळातील गॅलरीमध्ये जिथे सर्वसामान्य लोक बसू शकतात, त्याच ठिकाणी हा व्यक्ती बसला असल्याचे सचिवालयाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – विरोधात असाल तर…, मुश्रीफांच्या कारवाईवर जयंत पाटील यांची सरकारवर टीका

दुसरीकडे, अशा अज्ञात व्यक्ती सुरक्षा असताना देखील सभागृहात येतातच कशा? असा प्रश्न तक्रार दाखल केलेल्या आमदारांकडून उपस्थित करण्यात आला आहे. तर सभागृहाच्या आत प्रवेश करताना त्या दरवाज्यावर मार्शल्स उभे असतात, ते आमदारांना ओळखतात मग तरी सुद्धा असे अज्ञात व्यक्ती आत येतात कसे? हा मुद्दा निर्माण झाला आहे. तसेच सरकारला विरोधकांनी आधीच वेगवेगळ्या मुद्द्यावरून धारेवर धरलेले असताना आता हा आणखी एक नवीन मुद्दा विरोधकांना सत्ताधाऱ्यांना कोंडीस पकडण्यासाठी मिळाला आहे.

First Published on: March 11, 2023 12:48 PM
Exit mobile version