Budget 2022 : PM गती शक्ती योजनेवर भर, सरकार 25 हजार किमी महामार्ग आणि 1000 कार्गो टर्मिनल बांधणार

Budget 2022 : PM गती शक्ती योजनेवर भर, सरकार 25 हजार किमी महामार्ग आणि 1000 कार्गो टर्मिनल बांधणार

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022 चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. त्यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच त्यांच्याकडून पीएम गती शक्ती मास्टर प्लॅनचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पंतप्रधान गती शक्ती योजनेमुळे संपूर्ण देशातील पायाभूत सुविधा मजबूत होत असल्याचंही निर्मला सीतारामण यांनी अधोरेखित केलेय. या प्रकल्पाच्या मदतीने देशभरात पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास होत आहे.

या प्रकल्पावर सरकार 23000 कोटी रुपये खर्च करीत आहे. हा संपूर्ण प्रकल्प 107 लाख कोटी रुपयांचा आहे, ज्यामुळे संपूर्ण देशात विविध पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक क्षेत्रात विकास करायचा आहे. पीएम गती शक्ती योजनेंतर्गत देशात 25 हजार किमीचे महामार्ग बांधले जाणार आहेत. या योजनेंतर्गत ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’मध्येही वाढ करण्यात येणार आहे. पंतप्रधान गती शक्ती योजनेमुळे देशात प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे अर्थमंत्री म्हणाल्यात.

गती शक्ती योजना ही मंत्रालयांच्या सर्व विद्यमान आणि नियोजित उपक्रमांचा समावेश करणारा एक मास्टर प्लॅन आहे. यामध्ये आर्थिक क्षेत्र आणि कनेक्टिव्हिटीच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. या योजनेमुळे पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीमधील प्रादेशिक आणि क्षेत्रीय असमतोल दूर करण्यात मदत होईल, असे सरकारने यापूर्वी म्हटले आहे. त्यामुळे मुख्य क्षेत्रांत पायाभूत सुविधांमध्ये झपाट्याने वाढ होऊन रोजगार निर्मिती होईल.

सरकारचे सर्व पायाभूत सुविधा प्रकल्प गती शक्ती योजनेत एकत्रित केले जातील. या योजनेमुळे पायाभूत सुविधांच्या विकासातील सर्व अडथळे दूर होतील. PM गती शक्ती योजनेंतर्गत देशात 1000 कार्गो टर्मिनल बांधले जातील, असंही अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सांगितले.


हेही वाचाः Union Budget 2022 Live Updates: देशातल्या मोठ्या ५ टाऊनशिपमध्ये शैक्षणिक संस्था उभारणार – निर्मला सीतारामन

First Published on: February 1, 2022 11:52 AM
Exit mobile version