Video: मानवतेला काळीमा; मुंबईतील पवई येथे कुत्रीवर अमानुष लैंगिक अत्याचार

Video: मानवतेला काळीमा; मुंबईतील पवई येथे कुत्रीवर अमानुष लैंगिक अत्याचार

नूरीचा उपचारा दरम्यानचा फोटो

मुंबईतील पवई येथे मानवतेला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. एका कुत्रीवर लैंगिक अत्याचार करुन तिला जखमी करण्याचा किळसवाणा प्रकार पवईच्या गॅलरीया शॉपिंग मॉल येथे घडला आहे. अत्याचार झालेली कुत्री आठ वर्षांची असून तिचे नाव नूरी असल्याचे स्थानिक प्राणीमित्रांनी सांगितले. गुरुवारी हे प्रकरण उजेडात आले होते. भटक्या प्राण्यांना अन्न आणि औषधे पुरविणाऱ्या प्राणीमित्र महिलेला नुरी रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली होती. त्यानंतर नूरीला तात्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. उपचार होत असताना नुरीच्या गुप्तांगात ११ इंच लांबीचे लाकूड आत टाकले असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले.

नूरीला उपचारासाठी नेणाऱ्या देवी सेठ या प्राणीमित्राने मुंबई मिररला माहिती देताना सांगितले की, “मी जेव्हा नूरीला पाहिले तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात पडली निपचित पडली होती. नूरी ज्याठिकाणी पडली होती, तिथून अनेक लोक ये-जा करत होती, पण कुणालाही तिची काहीच पडलेली नव्हती. मात्र आम्ही आमची जबाबदारी पुर्णपणे पार पाडली आणि नूरीला उपचारासाठी घेऊन गेलो.”


नूरीची तब्येत अजूनही नाजूक आहे. तिच्या शरीरातून ११ इंचाचा दांडा बाहेर काढण्यात आला आहे. दांडा आत गेल्यामुळे तिच्या आतड्यांना मोठी इजा झाली आहे. काही अवयवांना गंभीर दुखापत झाल्याची शक्यता आहे. नूरी सध्या मृत्यूशी लढा देत आहे. ज्या एनजीओमध्ये नूरीवर सध्या उपचार सुरु आहेत, त्यांच्याकडून उपचारासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांना शोधून शिक्षा करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

पवई पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे. अज्ञात आरोपीवर कलम ३७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच Prevention of Cruelty to Animals Act च्या अंतर्गत देखील गुन्हा दाखल केला आहे. पवई पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक विजय दळवी म्हणाले की, ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणाला “आम्ही भेट दिली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु असून आम्ही लवकरच आरोपीला शोधून काढू.”

First Published on: October 26, 2020 5:47 PM
Exit mobile version