पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाची फसवणूक, पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाची फसवणूक, पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

fraud

सोने आणि कारच्या आमिषाने पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याची धक्कादाय घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यासह एका कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै २०२० ते जानेवारी २०२१ या सहा महिन्यांत घडलेल्या या प्रकारासंदर्भात संबंधित व्यवसायिकाने दिलेल्या तक्रारीत त्याला पिस्तूलाचा धाक दाखवून धमकावल्याचा आणि खोट्या गुन्हयात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

निखिल मिरगे (वय २९, रा. नांदेडसिटी) असे तक्रार दाखल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्याच्या तक्रारीवरून शहर पोलीस दलातील कर्मचारी संतोष सावंत आणि शुभ ट्रेड बीज इंडिया लिमिटेड या कंपनीचा संलालक अभिजित धोंडिबा सावंत यांच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपींनी संगनमताने त्यांच्या शुभ ट्रेड बीज लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केल्यास महिन्याला सोने आणि कार असा मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिक निखिल मिरगे यांचा विश्वास संपादन केला. सोशल मीडियावरही याबाबत जाहिरात करून मिरगे यांना आपल्या कंपनीत ६० लाखांहून अधिक रकमेची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर परतावा म्हणून त्यातील साडेतीन लाख रुपये मिरगे यांना परत दिले. पण त्यानंतर मात्र पैसे दिले नाहीत. याबाबत विचारणा करण्यासाठी मिरगे अभिजित सावंत याच्याकडे गेले असता त्यांना पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर पोलीस कर्मचारी संतोष सावंत यानेही मिरगे यांच्या नातेवाईकाला बोलावून घेऊन शिवीगाळ केली तसेच पैसे परत मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली, असे मिरगे यांनी तक्रारीत म्हटले आहे. यावेळी संतोष सावंत याने आपल्या कारची तोडफोड केल्याचेही मिरगे यांनी म्हटले आहे.

First Published on: February 9, 2021 5:06 PM
Exit mobile version